पालखी व पदयात्रा : विविध ठिकाणी सामूहिक ग्रामगीता वाचन उपक्रमसेवाग्राम : ‘गावागावाशी जागवा भेदभाव समुळ मिटवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे’ असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगितेतून सांगितले आहे. हाच मंत्र घेऊन स्वच्छता, गाव स्वावलंबन, स्वयंशासित, आरोग्य व व्यसनमुक्तीचा संदेश देणारी पालखी व पदयात्रा निघाली आहे. सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या यात्री निवास येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव अंतर्गत पालखी पदयात्रेचे आगमन झाल्यावर स्वागत केले. ग्रामगीता हा ग्रंथ घराघरात वाचला गेला पाहिजे. आजच्या युगात याची प्रकर्षाने गरज असल्याचे मत पालखी प्रमुख माधव नागापूरे यांनी व्यक्त केले. यावेळी आश्रमच्या शोभा तायडे, संगीता चव्हाण, अश्विनी बघेल यांनी महाराजांच्या प्रतिमेला सुतमाळ अर्पण केली. पदयात्रेतील सहभागींचे मंत्री प्रा.डॉ. श्रीराम जाधव यांनी स्वागत केले. माधव नागापुरे यांनी पदयात्रेची माहिती दिली. यावेळी नारखेडे दादा यांनी मार्गदर्शन केले. यात ५५० कि़मी.चा प्रवास केला असून महत्वपूर्ण २८ गावांत पंचायतराज, व्यसनमुक्ती, गाव स्वावलंबन, स्वच्छता, शिक्षण यावर प्रबोधनाचे कार्य केल्याचे सांगितले. या पालखीमध्ये चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, संभाजीनगर जिल्ह्यातील भक्तगण सहभागी आहेत. ध्यानधारणा, प्रार्थना संत्सग व प्रबोधन असा दैनिक कार्यक्रम असल्याचे सांगून आजच्या धकाधकीच्या जीवनात संस्कार व शांती हरवली. पालखी पदयात्रा ५ नोव्हेंबर ला अड्याळ टेकडी व मांगलगाव येथे पोहचेल. पालखीचे प्रमुख मारोती ठाकरे आहेत. याप्रसंगी जालधंरनाथ यांनी मनोगत व्यक्त केले. मंत्री प्रा.डॉ. श्रीराम जाधव, डॉ. शिवशंकर ठाकूर, भावेश चव्हाण, बाबा खैरकार, हिराभाई, पवन गणवार, ममता ठाकरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.(वार्ताहर)
तुकडोजी महाराज पुण्यतिथी उत्सवात प्रबोधन
By admin | Updated: October 28, 2016 01:45 IST