भास्कर कलोडे - हिंगणघाटशहराच्या मध्यभागी राष्ट्रीय महामार्गावरील उपजिल्हा रूग्णालयाच्या विस्तीर्ण परिसरात गत अडीच वर्षापासून बांधकाम पूर्णत्वास आलेली ६४ लाखांची ट्रामा केअर युनिटची वास्तू आहे. परंतु तांत्रिक त्रुटीच्या कारणावरून सध्या ती धूळखात पडली आहे. त्यामुळे अपघाती रूग्ण तातडीच्या सेवेपासून वंचित राहत आहे, तर अनेकांना वेळेवर योग्य उपचार न झाल्याने प्राणही गमवावे लागत आहे.नागपूर, हैदराबाद, उमरेड, चंद्रपूर वर्धा या राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील अपघाती रूग्णाला तातडीची मदत व्हावी म्हणून येथील उपजिल्हा रूग्णालयातील आवारात दीड कोटीचे ट्रामा केअर युनिट उभारण्याला मान्यता मिळाली होती. परंतु त्याप्रमाणात निधी मिळाला नाही. शेवटी सदर कामासाठी ६४ लाखांचा निधी मंजूर करून त्यानुसार इमारतीचे प्राकलन सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर केले. तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांची त्यांनी मंजुरी घेतली व त्याप्रमाणे ट्रामा केअर युनिटचे बांधकाम डिसेंबर २०११ मध्ये सुरू होवून जून २०१२ मध्ये पूर्णत्वास आले. परंतु या इमारतीचा ताबा घेऊन आरोग्य विभागाने ट्रामा केअर युनिट सुरूच केले नाही.स्थानिक उपजिल्हा रूग्णालयाचे तत्कालीन अधीक्षक डॉ. निखाडे यांनी या इमारतीच्या बांधकामात ४२ त्रृटी काढून त्याची पूर्तता झाल्याशिवाय सदर युनिट सुरू करण्यास असमर्थता दर्शविली. वरिष्ठाना तसा अहवालही पाठविला. त्यानंतर केंद्रीय आरोग्य विभागाचे दिल्लीचे विभागीय संचालक अलोने यांनी या वास्तूची पाहणी करून ३६ त्रृटींवर शिक्कामोर्तब केले. या त्रृटी दूर केल्याशिवाय सदर युनिट रूग्ण सेवेसाठी अयोग्य असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे सदरेअ युनिट केव्हा सुरू होणार हा असा प्रश्न पडला आहे.
अनेक त्रुटींमुळे ट्रामा केअर युनिट सपशेल नापास
By admin | Updated: January 7, 2015 22:56 IST