नगर पालिकेचे दुर्लक्ष : लाखोंचा खर्च वाया जाण्याच्या मार्गावर वर्धा : शहरातील सिग्नल्स अनेक वर्षापासून बंदच असल्याने वाहतुक व्यवस्थेवर त्याचा परिणाम होताना दिसतो. त्यामुळे यावर झालेला खर्चही व्यर्थ ठरतो की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बराच कालावधी लोटूनही नगरपालिका प्रशासनाकडून यंत्रणा सुरळीत करण्याकरिता प्रयत्न होत नाही. वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागावी म्हणून काही वर्षापूर्वी शहरातील आर्वी नाका चौक, बजाज चौक छत्रपती शिवाजी महाराज आदी वर्दळीच्या चौकात वाहतूक नियंत्रक दिवे बसविण्यात आले. सुरुवातीच्या काळात ही यंत्रणा सुरळीत होती. मात्र, नंतर कधी बंद, तर कधी सुरुचे ग्रहण या यंत्रणेला लागले. याचाच परिणाम म्हणून शहरातील वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस कोलमडत आहे. वाहतुक नियंत्रक दिव्यांच्या खांबाचा जाहिरातीचे फलक लावण्याकरिता वापर होत आहे. अनेक दिवे चुकीच्या ठिकाणी उभारण्यात आल्याने वृक्षांमध्ये गडप झालेले दिसून येतात. वाहतूक नियंत्रक शाखेने नगरपालिकेकडे वारंवार पाठपुरावा केला; मात्र दुर्लक्ष होत आहे. वाहतूक नियंत्रक दिवे सुरू करण्याविषयी पालिका प्रशासनाकडून कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाही. वाहतूक नियंत्रक दिव्यांच्या खांबावरच आर्वी नाका तसेच बजाज चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ही यंत्रणादेखील दोन-अडीच वर्षापासून बंद आहे. असे बंदचे ग्रहण शहराला लागलेले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहे. नव्याने बसविले जाणारे कॅमेरे कायमस्वरूपी सुरळीत ठेवावे, अशी मागणी होत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)
बंद सिग्नल्समुळे वाहतूक विस्कटलेली
By admin | Updated: February 22, 2017 00:54 IST