३१९ उमेदवार रिंगणात : ६८ ईव्हीएम मशिन्सचा वापर, मतदारराजा ठरविणार भाग्यवर्धा : जिल्ह्यात पहिल्यांदाच होत असलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीकरिता रविवारी मतदान होणार आहे. याकरिता प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. चारही नगरपंचायतीकरिता एकूण ३१९ उमेदवार रिंगणात असून या पैकी ६८ उमेदवार निवडूण द्यावयाचे आहेत. यात कोणाच्या हाती सत्तेची किल्ली द्यायची हे उद्या मतदार राजा ठरविणार आहे. सेलू, आष्टी, समुद्रपूर व कारंजा येथे होणार असलेल्या निवडणुकीकरिता सर्वच पक्षांनी आपाली आघाडी तयार करून पॅलन रिंगणात उतरविले आहे. भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बसपा या राष्ट्रीय पक्षांकडून त्यांच्या नेत्यांच्या प्रचार रॅल्या झाल्या आहेत. या निवडणुकीच्या खुल्या प्रचाराच्या तोफा शुक्रवारी रात्री थंडावल्या. यानंतर विविध पक्षाच्या नेत्यांसह त्यांच्या कार्यकर्त्यांकडून छुप्या प्रचाराला सुरुवात झाली. शनिवारची रात्र ‘कत्तल की रात’ म्हणून साऱ्याच पक्षाचे उमेदवार आणि त्यांच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी काम सुरू केल्याचे दिसून आले. विविध वॉर्डातील मतदाराला आपल्याकडे वळविण्याकरिता ‘साम दाम’चा वापर होत असल्याची चर्चा होती. रविवारी होणाऱ्या मतदानाच्या कार्यात कुठलीही गडबड होऊ नये याकरिता चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यांच्या मदतीला गृहरक्षक दलाचे कर्मचारी असल्याचे दिसून आले आहे. नागरिकांना मतदान करताना अडचण होणार नाही याकरिता प्रत्येक नगरपंचायतीच्या १७ वॉर्डात १७ मतदान केंद्रांमध्ये इव्हीएम मशीन्स देण्यात आल्या आहेत. या मशीनच्या माध्यमातून उद्या मतदारांचे भवितव्य बंद होणार आहे. यात मतदार कुणाला कौल देतात, हे मोजणीनंतरच कळेल.(लोकमत न्यूज नेटवर्क)
चार नगरपंचायतीकरिता आज मतदान
By admin | Updated: November 1, 2015 02:29 IST