देवळी : सुसाट निघालेला टिप्पर अनियंत्रित झाला. वाहनावरील ताबा सुटल्याने चालकाने न.प. ले-आऊट ते वर्धा मार्गावरील विद्युत खांबांना धडक दिली. यामुळे विजेच्या तारा तुटल्याने पुरवठा खंडित झाला. यामध्ये १५ खांब व तारा तुटल्याने दीड लाखांचे नुकसान झाले. वर्धा-यवतमाळ मार्गावर या तारा तुटल्याने मार्गावरील वाहतूक बराच वेळपर्यंत खोळंबून होती. हा प्रकार शनिवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडला. प्राप्त माहितीनुसार, डॉ. कांबळे यांच्या घराच्या बांधकामावर रेती व मुरुम टाकण्यासाठी हा टिप्पर या परिसरात आला. रेती टाकल्यानंतर टिप्परचे डाले खाली न करता, गाडी सुरू करून पुढे नेली. प्रारंभी भोंग ले-आऊट येथील विद्युत तारा तुटल्या. घाबरलेल्या चालकाने गाडीला गती दिल्यामुळे चाफले यांच्या घरासमोरील रोड, वीज वितरण कंपनीचे कार्यालय, बजरंग व्यायाम शाळा आखाडा, बकाने आरामशीन, तराळे चक्की व बसस्थानक चौक आदी भागातील १५ लोखंडी व सिमेंट खांब, तारा तुटून पडल्या. महादेव ठाकरे वसतीगृह परिसरात उभा असलेल्या प्रफुल नारायण लाकडे यांच्या मालकीच्या आॅटो क्र. एमएच ३१ बीसी २४६७ वर खांब पडल्याने त्यांचे १० हजाराचे नुकसान झाले. चालकाने टिप्परसह घटनास्थळावरून पळ काढला. देवळी पोलीस त्याच्या शोधात आहेत. या परिसरातील वीज पुरवठा दोन दिवसापर्यंत बंद राहणार असल्याचे महावितरणच्यावतीने सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
टिप्परने १५ विद्युत खांब व तारा तोडल्या
By admin | Updated: February 8, 2015 23:37 IST