वर्धा : एका चार वर्षाच्या मुलीवर शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा न्यायाधीश समीर अडकर यांनी आरोपी मंगेश बंडू बावणे (२२) रा. गिरड, वॉर्ड नं. ४, ता. समुद्रपूर यास भादंविच्या कलम ३७६, ५११ अन्वये ३ वर्षाच्या सश्रम करावासाची शिक्षा सुनावली. १२ जून २०१३ रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान आरोपी मंगेश याने एका पीडित मुलीस चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरी बोलावले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. सदर घटनेची माहिती पीडित मुलीने आपल्या आईला दिली. यावरून मुलीच्या आईने आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन गिरड येथे तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक शंकर भलावी व पोलीस निरीक्षक हुंदळेकर यांनी केला. तपासावरून न्यायालयात आरोपी विरूद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.सरकारी वकील अनुराधा सबाने यांनी घटना सिद्ध करण्यासाठी युक्तीवाद करीत एकूण सात साक्षदार तपासले. संपूर्ण साक्षिदारांच्या साक्षी-पुराव्याच्या आधारे तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत लक्षात घेत न्या. अडकर यानी पीडित मुलीस न्याय दिला. सहायक पोलीस उपनिरीक्षक इंचुरकर यांनी साक्षिदारांना न्यायालयात हजर ठेवण्याचे काम पाहिले.(शहर प्रतिनिधी)
अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीस तीन वर्षांचा सश्रम कारावास
By admin | Updated: March 12, 2015 01:35 IST