घटनेची नोंद : तपासानंतर गुन्हा पुलगाव : खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका व्हॅनने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तीन महिला जखमी झाल्या. हा अपघात शुक्रवारी सकाळी ९.१५ वाजताच्या सुमारास नजीकच्या शिव टेकडी वळणाजवळ झाला. दीपाली दिगंबर ठाकरे (३०), रूपाली तुकाराम बावणे (२२), मीना सुनील तिवसकर (२५) अशी जखमींची नावे आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार, स्थानिक हाऊसिंग बोर्ड कॉलनी येथील रहिवासी दीपाली, रूपाली व मीना या तिघी दुचाकी एमएच ३२-८५२४ ने कवठा (झोपडी) येथील कारखान्यात कामानिमित्त जात होत्या. शिव टेकडी वळणावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या एमएच ३२ सी ८४४६ या गाडीने धडक दिली. यात तिघीही जखमी झाल्या. जखमींवर स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. सदर प्रवासी वाहन हे सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचे असल्याची चर्चा घटनास्थळी होती. यानंतर जमावाने याची विचारणा पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांना केली असताना त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान, स्थानिक भाजपा कार्यकर्ते यांनी रुग्णालयात जाऊन जखमीची भेट घेतली. भाजपाचे माजी शहर अध्यक्ष नितीन बडगे व कार्यकर्ते यांनी घटनेबाबत पोलीस ठाण्यात विचारणा केली असता, समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचा त्यांचा आरोप आहे. यामुळे संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी घटनेची नोंद केली असून तपास सुरू केला आहे. तपासाअंती या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.(तालुका प्रतिनिधी)दोन अपघाताच्या घटनेत चौघे जखमीवर्धा - जिल्ह्यात दोन ठिकाणी झालेल्या अपघाताच्या घटनेत चारजण जखमी झाले. याबाबत रामनगर व पुलगाव पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली. वर्धा शहर परिसरातील साईनगर येथे झालेल्या घटनेत गोपाल वरघणे रा. सिंदी (मेघे) हे जखमी झाले. दुचाकीने जात असताना कार क्र.एम.एच.३२ वाय १७९० च्या चालकाने त्यांना धडक दिली. या घटनेची शुक्रवारी पोलिसात नोंद करण्यात आली.नाचणगाव येथून १२ व्यक्तींना घेऊन जाणारा मालवाहक आगरगाव शिवारात शुक्रवारी दुपारी पलटी झाला. यात तिघेजण जखमी झाले. जखमींना सावंगी येथील विनोबा भावे रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. शेख मतीन शेख रफी, निशांत टेंभरे, अब्दुल रफीक सर्व रा. पुलगाव अशी जखमींची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कारच्या धडकेत तीन महिला जखमी
By admin | Updated: February 13, 2016 01:28 IST