खासगी रुग्णालयात नेण्याची मागणी : पोलिसांकडून मंजुरीचे संकेत वर्धा : आदिवासी तरुणीचा विनयभंग करून फरार झालेला सेलूचा पोलीस उपनिरीक्षक राजू चौधरी याला ताब्यात घेताना त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता त्याने या शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रीयेवर अविश्वास दाखवत खासगी रुग्णालयात उपचार करण्याची मागणी केल्याची माहिती आहे. त्याच्या या मागणीला वर्धा पोलिसही होकार देण्याच्या तयारीत असल्याचे संकेत आहे. बोरधरण परिसरात आपल्या मित्रासह गेलेल्या एका आदिवासी तरुणीचा सेलू पोलीस ठाण्याचा उपनिरीक्षक राजू चौधरी व त्याचा चालक निलेश मेश्राम याने विनयभंग केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू असताना त्याने ठाण्यातून पळ काढला होता. तर त्याचा सहकारी निलेश मेश्राम याला अटक करण्यात आली. त्याचा सर्वत्र शोध सुरू असताना त्याला बडनेरा येथून ताब्यात घेण्याची प्रक्रीया सुरू असताना त्याने पुन्हा पळण्याचा प्रयतन केला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला वर्धेत आणत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा पाय व पाठीच्या मणक्यात फ्रॅक्चर असल्याने त्याच्यावर शस्त्रक्रीया करणे गरजेचे आहे. मात्र त्याने येथे उपचार करून घेण्यास नकार दिला आहे. शिवाय त्याने खासगी रुग्णालयात उपचार करण्याची मागणी केली. चौधरी याची मागणी मान्य करण्याची प्रक्रीया पोलीस विभागाकडून होत असल्याची माहिती आहे. तो रुग्ण असल्याने त्याची मागणी पूर्ण करणे गरजेचे असल्याने त्याला खासगी रुग्णालयात उपचार करण्याची मुभा देणे शक्य असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यामुळे विविध चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी)
‘त्या’ उपनिरीक्षकाचा शासकीय रुग्णालयाच्या उपचारावर अविश्वास
By admin | Updated: July 1, 2015 02:36 IST