वर्धा : सिर्सि नाला प्रकल्पाच्या पुच्छ वितरिकेसाठी सन २००४-०५ मध्ये सांडस, कवडापूर व तुरी मजरा येथील शेकतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत केल्या. त्यांना अद्याप मोबदला मिळाला नाही. हा मोबदला मिळण्याकरिता येथील विशेष भूअर्जन अधिकारी कार्यालयात मंगळवारी किसान अधिकार अभियानच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. मागणी असलेल्या चार प्रकरणाची रक्कम तीन महिन्यात तर एका प्रकरणाचा निकाल एका वर्षात लावू अशा लेखी आश्वासनावर आंदोलन मागे घेण्यात आले. विभागाच्यावतीने भूसंपादीत केलेल्या जमिनीचा मोबदला मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी संबंधीत कार्यालयाच्या चकरा मारल्या; मात्र योग्य तो मार्ग काढण्यात आला नाही. या संदर्भात लोकशाही दिनात जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनही दिले. तरीही कार्यवाही झाली नाही. यामुळे आज आंदोलन करण्यात आले. गत अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रकरण सोडवण्यासाठी शेतकऱ्यांनी कार्यालयात थांबण्याचा निर्धार केला होता. यावेळी अधिकारी व शेतकऱ्यांत झालेल्या चर्चेदरम्यान मदतीची प्रतीक्षा असलेल्या पाच प्रकरणापैकी चार प्रकरणे जून महिन्यापर्यंत निकाली काढू व १२० क्रमांकाचे प्रकार निकाली काढण्याकरिता किमान एका वर्षाचा कालावधी लागेल असे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे यांनी दिली. यावेळी लक्ष्मण गुंडे, सिताराम चंदनखेडे, हेमंत पाहुणे, मुरलीधर झोडे, विलास भुजाडे, रोशन निळकंठ बेले, विकास मुरलीधर झोडे, हेमंत तेलरांधे यांच्यासह शेतकरी व अभियानवे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
विशेष भूअर्जन कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या
By admin | Updated: March 18, 2015 01:56 IST