लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : संपूर्ण जानेवारी महिना आणि फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत उच्चांक गाठत असलेल्या कोविडच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव सध्या ओसरत असला तरी कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेचा तुलनात्मक विचार केल्यास कोविडची दुसरी लाटच वर्धेकरांसाठी घातक ठरल्याचे वास्तव आहे.कोरोनाची दुसरी लाट उच्चांक गाठत असताना २८ एप्रिल २०२१ला एकाच दिवशी जिल्ह्यात तब्बल १ हजार ४२२ नवीन रुग्णांची भर पडली होती. शिवाय त्यावेळी जिल्ह्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर या रुग्णखाटांसह आवश्यक औषधांचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून भविष्यातील कोविडची तिसरी लाट गृहित धरून जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला गती देण्यासह कोविड रुग्णालयातील विविध सुविधांबाबत प्रभावी नियोजन करण्यात आले. त्याचा फायदाच कोविडच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी झाला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्ण गंभीर होत हॉस्पिटलाइज होण्याचे प्रमाण कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
पॉझिटिव्हीटी दरात कमालीची घट- मागील आठवड्यात जिल्ह्याचा कोविड पॉझिटिव्हीटी दर १०.१२ टक्के होता. तर या आठवड्यात ४.६८ टक्क्यांवर आला आहे. ही बाब वर्धा जिल्ह्यातील नागरिकांसाठी दिलासादायक असली तरी कोविडचे संकट अद्यापही वर्धा जिल्ह्यावर कायम आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे.
त्रि-सूत्री ठरते फायद्याची- कोविड संकट काळात वेळोवेळी हात धुणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे आणि मास्कचा वापर करणे या त्रि-सूत्रीचे काटेकोरपणे पालन करणे फायद्याचीच ठरते. शिवाय कोविडची लस कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासह कोविड मृत्यू रोखण्यासाठी फायद्याची ठरत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.