शाळा व मंदिरांच्या सभोवताल दारूचे गुत्थेतळेगाव (श्या.पं.) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर येथील बसस्थानक चौकात उड्डाणपुलाखाली जुगाराची दुकाने (वरली मटका) थाटण्यात आली आहे. जुगार कायद्यांतर्गत वरली, मटक्यावर बंदी असताना येथे राजरोसपणे हा अवैध व्यवसाय सुरू आहे. पोलिसांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. २००७ मध्ये बसस्थानक चौकात उड्डाणपुलाची निर्मिती झाली. या पुलामुळे अनेकांवर बेरोजगारीचे संकट कोसळले; पण अवैध व्यावसांयिकांचे फावले. उड्डाणपुलाखाली महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराच्या सभोवताल वरली-मटका व्यावसायिक आपली माणसे खुलेआम बसवून उतारा घेतात. उड्डाणपुलाच्या २०० मीटर अंतरावर हायस्कूल तर ५०० मीटर अंतरावर पोलीस ठाणे आहे. पुलाखालीच ग्रामीण भागात जाण्याकरिता आॅटो स्टॅन्ड आहे. शिवाय पुलाखालूनच हायस्कूलमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा मार्ग आहे. याच चौकात राजरोसपणे वरली मटक्याची दुकान तसेच दारूविक्री होत असल्याचे दिसून येते. यामुळे विद्यार्थ्यांच्या संस्कारश्रम मनावर त्याचा विपरित परिणाम होत असल्याचे दिसते. मुलांना शाळेत, अंगणवाडीत घेऊन जात असताना महिलांना मद्यपिंचा त्रास सहन करावा लागत आहे. गावात काही भागात खुलेआम जुगार भरविला जातो. पुलाखाली सट्टापट्टीची दुकाने सुरू असल्याने कुटूंब व्यवस्थेवर विपरित परिणाम होत आहे. उड्डाणपुलामुळे येथे होणारी वाहतुकीची कोंडी सुटली; पण बेरोजगारांची समस्या वाढली आहे. आता हेच बेरोजगार पुलाखाली बसून दिवसभर गप्पागोष्टी करीत असून वरली मटकाच्या आहारी गेल्याचेही दिसून येते. सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत सट्टापट्टीचा व्यवसाय सुरू असतो. अर्जनवीसाप्रमाणे हे व्यावसायी दुकान थाटून बसलेले असतात. ही बाब सर्वांना माहिती असताना कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलीस यंत्रणेने याकडे लक्ष देत कारवाई करावी आणि जुगार व दारूविक्री हद्दपार करावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)
उड्डाणपुलाखाली थाटली वरली मटका दुकाने
By admin | Updated: July 24, 2015 01:56 IST