वर्धा : जिल्हा परिषदेंतर्गत प्राथमिक शिक्षकांचे डिसेंबर २०१४ चे वेतन ३० जानेवारीनंतर आणि जानेवारी २०१५ चे वेतन १० मार्च २०१५ नंतर करण्यात आले़ वेतनातील विलंबाचा तिढा अद्यापही कायम असल्याने शिक्षकांना त्रास सहन करावा लागत आहे़ शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत वेतनातील विलंब दूर करावा, अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात येत आहे़ गत तीन महिन्यांपासून शिक्षकांचे वेतन विलंबाने केले जाते़ यामुळे शिक्षकांना त्रास सहन करावा लागत आहे़ शिवाय स्वत:च्या खिशातून शालेय पोषण आहार योजना राबवितानाही तारेवरची कसरत करावी लागते़ याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा केल्यास शासनाकडून वेतनांसाठी पूर्ण अनुदान वेळेवर प्राप्त होत नाही, हेच उत्तर दिले जाते़ ही बाब खरी असेल तर वर्धा जिल्ह्याच्या शेजारील अन्य जिल्ह्यात वेतन कसे लवकर होते, हा प्रश्नच आहे़ वर्धा जिल्ह्यात वर्षभरच मार्च एन्डींगसारखे वेतन होते़ यासाठी कामचुकारांवर कारवाई करावी, जि.प. व पं.स. शिक्षण विभागातील कर्मचारी व शिक्षकांचे वेतन एकाच दिवशी करावे, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे़ असे केल्यास लिपिकांना वेतनाचे महत्त्व कळेल व वेतन वेळेत होईल़ याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे़(कार्यालय प्रतिनिधी)
शिक्षकांच्या वेतनाचा तिढा अद्यापही कायम
By admin | Updated: March 27, 2015 01:27 IST