वर्धा : तरोडा येथील जिल्हा परिषद शाळा सोलर होणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग तयारीला लागला आहे. या अनुषंगाने शनिवारी शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांच्या कक्षात संबंधित अधिकाऱ्यांनी बैठक पार पडली. या बैठकीत या योजनेची रुपरेखा आखण्यात आली. उल्लेखनीय, तरोडा हे गाव खासदार आदर्श ग्राम योजनेंतर्गत दत्तक घेतलेले आहे.सोलरचा प्रयोग प्रायोगिक तत्वावर करण्यात येणार असून ही विदर्भातील पहिली शाळा ठरणार आहे. यामुळे शाळेची महिन्याचे वीज बिलापोटी सुमारे एक हजार रुपयांची बचत होणार आहे. हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी येणारा खर्च लोकवर्गणी वा सीएसआर (कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी) च्या माध्यमातून करण्याचा मानस शिक्षणाधिकारी (प्राथ.) रवींद्र काटोलकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.महावितरणने मध्यंतरी शाळांसाठी व्यावसायिक दर लावले होते. नंतर यावर तोडगा म्हणून व्यावसायिक व घरगूती मधला दर लावला. तोही शाळांना न परवडणारा आहे. यामुळे शाळा अनुदानाची अधिक रक्कम वीज बिलाचा भरणा करण्यात खर्च होत होती. याबाबत शासनाकडे पाठपुरावा देखील करण्यात आला. जिल्हा नियोजनच्या बैठकीतही यावर तोडगा निघाला नाही. अखेर यावर पर्याय म्हणून शाळा सोलर करण्याची संकल्पना पुढे आली. यासाठी सुरुवातीला ५० ते ७५ हजारांचा खर्च अपेक्षित आहे. ही रक्कम लोकवर्गणी वा सीएसआरच्या माध्यमातून उभी करण्यावर विचार विनिमय सुरू आहे. हा प्रयोग यशस्वी झाला, तर शाळेला महिन्याला वीज बिलापोटी भराव्या लागणाऱ्या सुमारे एक हजार रुपयांची बचत होईल. वर्षाला ही बचत १२ हजार रुपयांची असेल. महत्त्वाचे म्हणजे, कायमस्वरुपी शाळेची वीज बिलाची रक्कम वाचणार आहे. सोलर काम न केल्यास त्या कालावधीतील वीज बिलाचा तेवढा भरणार करावा लागणार आहे. सोलरचा देखभाल व दुरुस्तीचा खर्च केवळ १०० रुपये असेल. ही बाब सभेत चर्चिली गेली. सभेला उपशिक्षणाधिकारी धनराज तेलंग व आर. एन. मेश्राम, गटशिक्षणाधिकारी अशोक कोडापे, मदनीचे केंद्र प्रमुख सुधीर पावडे व तरोडाचे मुख्याध्यापक प्रवीण चौधरी उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)
तरोडा जि.प. शाळा सोलर होणार
By admin | Updated: May 17, 2015 02:33 IST