वर्धा : जिल्ह्यात काही ठिकाणी सरकारी जमिनींवरही ले-आऊट टाकण्याचे प्रकार सुरू आहे. आता पिपरी (मेघे) परिसरातील जुनापाणी चौकालगत असलेल्या काबीलकास्त जमिनीवर ले-आऊट पाडण्याचा उपद्रव सुरू असल्याची माहिती आहे. सदर भागात जेसीबी यंत्राच्या साह्याने सपाटीकरणाचा प्रयत्न झाला. दरम्यान, तलाठ्यांनी पाहणी करीत संबंधितांना हटकल्याने ही प्रक्रिया थांबली.पिपरी (मेघे) परिसरात जुनापाणी चौकालगत सिंचन विभागाच्या कार्यालयाच्या मागील बाजूस काबीलकास्त जमीन आहे. सदर जमीन सरकारजमा झाली असून त्याचा उपयोग ले-आऊटसाठी करता येत नसल्याचे सांगण्यात येते. तथापि, येथे नागपूर, कामठी भागातून येणाऱ्या काही जणांनी ले-आऊट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यासाठी जेसीबी यंत्राच्या वापराने जमिनीचे सपाटीकरण करण्याचा प्रयत्न झाला. याबाबत माहिती मिळताच तलाठ्यांनी पाहणी केली. तेथे यंत्राचा वापर करून सपाटीकरण करणाऱ्यांना ताकीद देत यंत्राचा वापर थांबविण्यात आला. यामुळे सध्या या परिसरातील सपाटीकरणाची प्रक्रिया थांबली असली तरी जेसीबी यंत्र त्याच परिसरात आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
काबीलकास्त जमिनीवर सपाटीकरणाचा प्रयत्न
By admin | Updated: July 30, 2015 01:58 IST