हिंगणघाट : येथील शिवाजी उद्यानाजवळच्या भारत दिनांत विद्यालयातील चपराशाने विद्यालयाच्या कार्यालयात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी ९ वाजता उघड झाली. मृतकाचे नाव अनिल गुलाब भोसकर असे असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतक अनिल भोसकर यांच्या नातलगांनी या प्रकरणाला जबाबदार संस्थाचालक असल्याचा आरोप करीत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीकरिता पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली होती. शिवाय जोपर्यंत संस्थाचालक येत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांच्या मध्यस्थिने हा वाद मिटविण्यात आला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल गुलाब भोसकर (४५) रा. सेंट्रल वॉर्ड हिंगणघाट हा भारत दिनांत विद्यालयात चपराशी आहे. काल रात्री तो शाळेत चौकीदार म्हणून कामावर होता. मंगळवार सकाळी घरी असताना ९ वाजताच्या दरम्यान त्यांच्या भ्रमणध्वनीवर फोन आला. त्यानंतर तो शाळेत जात असल्याचे सांगून घरून निघाला. २८ आॅक्टोबरला प्रोग्रेसीव्ह एज्युकेशन सोसायटी अंतर्गत सर्व विद्यालयाच्या मुख्याध्यापकासाठी सभा आयोजित केली होती. त्यानुसार या विद्यालयाचे मुख्याध्यापक मधुकर बोसरकर शाळेत कागदपत्रे नेण्यासाठी आले होते. त्यांनी कार्यालयाच्या दाराला धक्का देताच चपराशी अनिलचा मृतदेह पंख्याला गळफास लावून आढळला. त्यांनी त्वरित संस्था सचिव रमेश धारकर यांना माहिती देऊन पोलिसांना सूचना दिली. पोलीस पंचनामा सुरू असून सद्या तरी गळफास लावून आत्महत्येचा प्रकार दिसत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येची नोंद घेतली असून तपास सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)
गळफास लावून आत्महत्या
By admin | Updated: October 28, 2014 23:01 IST