हिंगणघाट : सुमारे १५०० कोटी रुपये उलाढाल असलेल्या विदर्भातील सर्वांत मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी अॅड. सुधीर कोठारी हे सलग चौथ्यांदा विराजमान झाले. उपसभापती पदावर हरिष वडतकर हे दुसऱ्यांदा आरूढ झाले. गुरूवारी दुपारी १२ वाजता निवडणूक अधिकारी स्मिता पाटील यांच्या अध्यक्षतेत कृउबासच्या सभागृहात नवनिर्वाचित संचालक मंडळाची सभा झाली. सभापती व उपसभापती पदासाठी अॅड. कोठारी व वडतकर हे दोनच उमेदवारी अर्ज आल्याने त्यांना अविरोध विजयी घोषित केले.अॅड. कोठारी हे हिंगणघाट बाजार समितीचे गत २० वर्षांपासून संचालक असून १५ वर्षांपासून सभापती म्हणून काम पाहत आहेत. यंदा चौथ्यांदा ते सभापती पदावर आरूढ झाले. त्यांच्या कार्यकाळात हिंगणघाट बाजार समिती ही राज्यातील सर्व बाजार समित्यांसाठी ‘रोल मॉडेल’ ठरलेली आहे. शेतकरी हिताचे अनेक क्रांतीकारी निर्णय त्यांनी घेतले आहेत. सहकार क्षेत्रात वरचष्माहिंगणघाट : नाममात्र १ रुपयांत शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना जेवण देण्याच्या त्यांच्या निर्णयाचे सर्वस्तरावर अभिनंदन होत आहे. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात त्यांचा वरचष्मा असून नगर परिषदेचे ते विद्यमान अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. येथील वणा नागरिक बँक, हिंगणघाट नागरी पतसंस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहे. त्यांच्या निवडीचे जिल्ह्यातील सहकार नेते माजी आमदार सुरेश देशमुख, माजी राज्यमंत्री आ. रणजीत कांबळे, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उषा थुटे यांनी स्वागत केले आहे. बाजार समितीच्या सभागृहात अॅड. कोठारी यांच्या विजयाची औपचारिक घोषणा होताच त्यांचे सहकारी माजी आमदार राजू तिमांडे, समुद्रपूर कृउबासचे सभापती हिंमत चतूर, समुद्रपूर पं.स. उपसभापती अशोक वांदिले, वासुदेव गौळकार व समर्थकांनी समाधान व्यक्त केले.(तालुका प्रतिनिधी)
बाजार समितीच्या सभापतिपदी सुधीर कोठारी चौथ्यांदा विराजमान
By admin | Updated: November 4, 2016 01:49 IST