डोके फोडले : नागठाणा शिवारातील घटना वर्धा : दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एकाला मारहाण करून जखमी केले. ही घटना मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास नागठाणा शिवारात घडली. चंद्रभान मारोती कौरती (३२) रा. नागठाणा, असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी तक्रारीवरून नितेश कोकाटे रा. नागठाणा याच्याविरुद्ध सावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्ह्यात दारूविक्रीस बंदी असतानाही शहरासह गाव-खेड्यात ठिकठिकाणी दारूविक्रीचा व्यवसाय जोरात सुरू आहे. गावातील दारूविक्रीचे व्यवसाय गावातील शांतता भंग करण्यास कारणीभूत ठरत आहे. होत असलेल्या या प्रकराला जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा जबाबदार असल्याची चर्चा आहे. ही चर्चा खरी असल्याचा प्रत्यय पुन्हा नागठाणा येथे झालेल्या मारहाणीच्या घटनेने आला आहे. नागठाणा येथील चंद्रभान कौरती गावातीलच शाळेच्या मागे बसून होते. दरम्यान, तेथे नितेश कोकाटे आला. त्याने चंद्रभानला दारू पिण्याकरिता पैशाची मागणी केली. यावर चंद्रभानने नकार दिला. यामुळे या दोघांत वाद झाला. या वादात नितेश याने चंद्रभानच्या डोक्यावर दगड मारून त्याला जखमी केले. या घटनेची चंद्रभान कौरती यांनी सावंगी पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी नितेश कोकाटे यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३२४ अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.(शहर प्रतिनिधी)
दारू पिण्यास पैसे देण्यास नकार दिल्याने मारहाण
By admin | Updated: November 2, 2016 00:33 IST