पोलिसांचा शोध सुरू : १५ मुली, तर नऊ मुलांना शोधण्याचे आव्हानवर्धा : जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या बालकांच्या तक्रारी त्यांच्या पालकांकडून करण्यात येत आहेत. या बेपत्ता बालकांचा शोध घेण्यात पोलीस विभाग मात्र असमर्थ असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्याती २४ बालके अद्यापही बेपत्ता असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. यात १५ मुली तर नऊ मुलांचा समावेश असल्याची माहिती आहे. जिल्ह्यात केलेल्या सर्वेक्षणात सन २०११ पासून २०१५ पर्यंत ३३ मुले बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. यात ११ मुले तर २२ मुलींचा समावेश आहे. मुलींची अधिक असलेली संख्या ही चिंतेचा विषय आहे. या काळात एकूण २८१ मुले व ५०९ मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यातील २७९ मुले व ४८७ मुलींचा शोध लावण्यात यश आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अशाच बेपत्ता असलेल्या बालकांचा शोध घेत त्याना त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचविण्याकरिता गृह खात्याच्यावतीने ‘आॅपरेशन मुस्कान’ ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरात बेपत्ता असलेल्या बालकांचा शोध घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. या सूचनेनुसार जिल्ह्यात काम सुरू आहे. पोलीस विभागाच्यावतीने १ जुलैपासून ही मोहीम सुरू झाली आहे. यात नऊ बालकांचा शोध घेण्यात वर्धा पोलिसांना यश आले आहे. यात दोन मुले आणि सात मुलींचा समावेश आहे. पोलिसांच्यावतीने सुरू असलेल्या तपासादरम्यान आढळलेल्या या बालकांची माहिती त्यांच्या पालकांना पहिलेच असल्याचे समोर आले. त्यांना आपली मुलगी आज कुठे आणि कोणासोबत आहे याची कल्पना असताना त्यांनी ती माहिती पोलिसांना दिली नसल्याचे समोर आले आहे. याचा त्रास पोलिसांना तपासादरम्यान होत असल्याचे म्हणणे आहे. पालकांचे सहकार्य मिळाल्यास हा आकडा लवकरच कमी होईल, असे पोलीस बोलत आहेत.(प्रतिनिधी)
अद्यापही २४ बालके बेपत्ताच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2015 02:14 IST