आरोग्यसेवेचे व्रत पुढे नेण्याचा संकल्प : माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या रम्य आठवणीवर्धा : दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ संचालित सावंगी मेघे येथील शरद पवार दंत महाविद्यालयाच्या रजत महोत्सवानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा सहभाग असलेला आरंभ ९१ हा स्रेहमीलन समारोह थाटात साजरा करण्यात आला. यावेळी १९९१ च्या बॅचने आरोग्यसेवेची मशाल १९९२ या बॅचच्या हाती दिली. या नेत्रदीपक व भावपूर्ण सोहळ्याचे उद्घाटन कुलगुरू दत्ता मेघे यांच्या हस्ते करण्यात आले. दत्ता मेघे सभागृहात आयोजित या समारोहाला विद्यापीठाचे मुख्य सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, कुलगुरू डॉ. दिलीप गोडे, प्रकुलगुरू डॉ. व्ही. के. देशपांडे, कुलसचिव डॉ. राजीव बोरले, मुख्य समन्वयक डॉ. एस. एस. पटेल, दंत महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. ए.टी. बिवीजी, डॉ. के. एन. इंगळे, अधिष्ठाता डॉ. अशोक पखान, ज. ने. वैद्यकीय महाविद्यालयाचखे अधिष्ठाता डॉ. संदीप श्रीवास्तव, डॉ. तनखीवाले, आरंभ आयोजन समितीच्या अध्यक्ष डॉ. मीनल चौधरी आदी उपस्थित होते.या समारोहात माजी अधिष्ठाता, माजी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व इतरही मान्यवरांचा शाल, स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. माजी अधिष्ठाता डॉ. के. एन. इंगळे यांनी सत्काराला उत्तर देताना आरोग्यसेवा अशीच सुरू राहण्याची आवश्यकता व्यक्त केली. डॉ. बिवीजी यांनीही विचार व्यक्त केले. माजी विद्यार्थ्यांपैकी डॉ. पंकज बजाज व डॉ. प्रिंतीदर कौर यांनीही मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाची माजी विद्यार्र्थिनी डॉ. मोना गोयल हिला अंधत्वामुळे आलेल्या प्रसंगात तिने दिलेल्या समर्थ लढ्याची डॉ. उज्ज्वल पाटणी यांनी दिली. डॉ. मोना गोयल यांचाही सत्कार करण्यात आला. दंत महाविद्यालयाच्या विशेषांकाचे प्रकाशनही अतिथींच्या हस्ते करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांनी दोन लाख रूपयांचा धनादेश दंत महाविद्यालयातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांला स्वतंत्र सुवर्णपदक देण्याकरिता कुलगुरू दत्ता मेघे याच्याकडे सुपूर्त केला. परिसरातील शालिनीताई कन्या सदनालाही विद्यार्थ्यांनी ११ हजार रूपयांची देणगी दिली.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. पखान यांनी महाविद्यालयाच्या वतीने चालविण्यात येत असलेले नवनवीन उपक्रम आणि व आरोग्य शिबिरांविषयी माहिती दिली. याच समारोहात १९९१ च्या बँचच्या विद्यार्थ्यांनी आरोग्यसेवेची मशाल नंतरच्या म्हणजेच १९९२ च्या बँचकडे सोपविली. समारोहाचे समारोपीय आभार डॉ. नीलेश राठी यांनी मानले. समारोहानंतर दंत महाविद्यालयालगत रजत जयंती पथाचे उद्घाटन अतिथी व माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, या सोहळ्यानिमित्त विद्यार्थ्यांच्या हस्ते स्मृतिवृक्षारोपणही करण्यात आले. सायंकाळी सांस्कृतिक समारोहाने या कार्यक्रमाची सांगता झाली. महाविद्यालय सोडल्यानंतर प्रथमच हे विद्यार्थी एकत्र भेटले. त्यामुळे हा सोहळा त्यांच्यासाठी स्मरणीय असाच होता.(शहर प्रतिनिधी)
माजी विद्यार्थ्यांच्या सहभागातून रंगला ‘आरंभ ९१’
By admin | Updated: January 10, 2016 02:41 IST