खेळाडूंची गैरसोय वाढली : संरक्षण भिंत नसल्याने प्राण्यांचा संचार लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी (शहीद) : देशाच्या भावी पिढीत शिक्षणासोबत खेळण्याची आवड निर्माण व्हावी हा हेतू बाळगून शासनाने गाव तिथे क्रीडांगण धोरण अस्तित्वात आणले. या अंतर्गत तालुका स्तरावर क्रीडा संकुलची निर्मिती करण्यात आली. नियोजनाचा अभाव, निधी देण्यास दिरंगाई यामुळे क्रीडा संकुलात सोई-सुविधांचा अभाव आहे. खेळाडूंना आवश्यक सुविधा मिळत नसल्याने कामगिरीवर विपरीत परिणाम होतो. येथील क्रीडा संकुलात सुविधांचा अभाव दिसून येतो. येथील क्रीडा संकुलाचा उर्वरित विकास करण्यासाठी शासनाकडून निधी मिळाला तरच काम मार्गी लागेल. शिवाय खेळाडूंना स्पर्धेची तयार करण्यास मदत होईल. याकरिता जिला क्रीडा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. ३० हजार चौरस फुट एवढ्या विस्तीर्ण जागेत येथे क्रीडा संकुल तयार करण्यात आले. काही वर्षांपूर्वी संकुलाभोवती जाळीचे कुंपन उभारण्यात आले होते. कालांतराने या जाळ्या तुटल्या तर काही चोरट्यांनी लंपास केल्या. यामुळे संरक्षण म्हणुन लावलेले कुंपन तुटले. हा परिसर खुला झाल्याने येथे दिवसभ पशु, वराह यांचा मुक्तसंचार पाहायला मिळतो. येथे कबड्डीकरिता प्रांगण, बॅडमिंटन कोर्ट, व्यायामशाळा उभारण्यात आली. मात्र त्याची देखभाल व दुरूस्ती करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. येथे प्रवेशद्वार बांधण्यात आले. संरक्षण भिंतीअभावी प्रवेशद्वार बंद असूनही कुणालही थेट प्रवेश करता येतो. क्रीडांगणाच्या परिसरात पथदिव्यांची व्यवस्था नाही. त्यामुळे खेळाडूंना रात्रीचा सराव करता येत नाही. शतपावली करायला येणारे, व्यायाम व खेळण्यासठी येणाऱ्यांना काळोखाचा सामना करावा लागतो. येथे सरपटणारे प्राणी असल्याने नागरिक येथे येण्यास घाबरतात. याच संकुलावर राष्ट्रीय सणाला विविध कार्यक्रम होतात. मात्र देखभाल दुरूस्ती करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. शासनाकडून अनुदान मिळत नाही. त्यामुळे एवढ्या मोठया क्रीडांगणाचे व्यवस्थापन करण्यास अडथळा निर्माण होत आहे. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी यावर सकारात्मक तोडगा काढून तालुका क्रीडा संकुलाचा उर्वरीत बांधकामाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करण्याची मागणी आहे. तसेच तालुका क्रीडा अधिकारी पद भरण्याची गरज क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली. आष्टी तालुक्यातील कबड्डी खेळाडुंनी राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी केली आहे. खेळाडूंना चांगली कामगिरी करण्यास वाव मिळाल्यास खेळाडू तयार होतील. त्यासाठी विकासकामांना प्राधान्य देण्याची मागणी आहे. आधुनिक सुविधांची वानवा सन २०१० ते १३ या तीन वर्षामध्ये क्रीडा संकुलासाठी ७५ लक्ष व ४० लक्ष असा टप्प्याटप्प्याने निधी प्राप्त झाला. मात्र सुमार दर्जाचे बांधकाम झाल्याने या निधीचा विशेष उपयोग झाला नाही. बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तालुका क्रीडा संकुलात आधुनिक सोयीसुविधा देण्याची गरज व्यक्त होत आहे. आष्टी येथील तालुका क्रीडा संकुलावर कबड्डीचा अनेक वर्ष सराव केला. राज्यस्तरावर ३ वेळा, राष्ट्रीय स्तरावर २ वेळा प्रतिनिधित्त्व केले. आष्टीचे नाव विजयाच्या पटलावर झाल्याचे समाधान आहे. मात्र संकुलाचा विकास आवश्यक आहे. - महेंद्र चव्हाण, कबड्डी खेळाडू (राष्ट्रीय स्तर)
क्रीडा संकुल विकासाच्या प्रतीक्षेत
By admin | Updated: May 17, 2017 00:36 IST