वर्धा पालिकेत गोंधळ : पावसाळ्याच्या तोंडावर नागरिकांच्या पुढ्यात कचऱ्याचे ढिगारेवर्धा : नगर परिषदेच्या उपाध्यक्षाला सध्या अध्यक्षपदाचे डोहाळे लागले आहेत. यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्षात उडणारे खटके नित्याचेच झाले आहे. परिणामी वर्धा पालिकेची ओळख रोजभांड पालिका अशी होत आहे. या दोघांत होत असलेली भांडणे आता चव्हाट्यावर येवू लागल्याने शहराच्या विकासाला खिळ बसली आहे.पालिकेवर काँग्रेसची सत्ता असताना नगराध्यक्षावर अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला होता. यावेळी पालिकेत सत्ता स्थापन करताना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात गठबंधन झाले. यातून राष्ट्रवादी काँग्रसेला अध्यक्ष व भाजपला उपाध्यक्षपद देण्याचा निर्णय झाला होता. आता मात्र अचानक उपाध्यक्षांना अध्यक्षपदाचे डोहाळे लागले. यामुळे हे गठबंधन धोक्यात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पावसाळा तोंडावर आला आहे. पालिकेच्यावतीने नाल्यांतील कचरा काढण्याचे कार्य सुरू आहे; मात्र त्यात सातत्य नसल्याने शहरातील अनेक नाल्या कचऱ्याने तुंबल्या आहेत. तर काही ठिकाणी काढण्यात आलेला कचरा रस्त्याच्या कडेला नागरिकांच्या घरासमोर साचला आहे. याचा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे. रोजच आकाशात आभाळ दाटत असल्याने कोणत्याही क्षणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे अनेकांच्या घरासमोर असलेल्या कचऱ्यामुळे रोगराईमुळे पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. याची माहिती अनेकांनी पालिकेला दिली; मात्र अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या भांडणात याकडे कोणीही लक्ष देण्याकरिता कोणीही तयार नाही. या दोघांच्या भांडणात पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनीही अनेक कामाच्या फाईल्स अडवून ठेवल्याचा आरोप नगरसेवक जगदीश टावरी यांनी केला आहे. यामुळे वर्धा पालिकेत नेमके सुरू तरी काय आहे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. वर्धा पालिकेत सध्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांत वाद सुरू आहे. या वादामुळे शहरातील अनेक विकासकामांना खीळ बसली आहे. याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. शहराच्या विकासाकरिता आलेला निधी तसाच खितपत पडून आहे. पालिकेत सुरू असलेल्या कमिशनखोरीच्या वादामुळे विकास खोळंबला आहे.- जगदीश टावरी, नगरसेवक प्रभाग क्र.७, वर्धा
अध्यक्ष-उपाध्यक्षाचा वाद चव्हाट्यावर
By admin | Updated: June 13, 2016 00:30 IST