रूपेश मस्के - कारंजा(घा.)नजीकच्या खैरी धरणावरून कारंजावासीयांना पाणीपुरवठा करणारी विहीर कालबाह्य झाली आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता ही व्यवस्था तोकडी पडत असल्याने नवीन विहीर व जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीची मागणी केली जात आहे१९९५ मध्ये वाढीव कारंजा-खैरी संयुक्त पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली. प्रत्यक्षात योजनेचा प्रारंभ २ नोव्हेंबर २००१ रोजी तल्कालीन विधानसभा उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांच्या हस्ते झाला. त्यावेळेस लोकसंख्या ९ हजार १२८ होती. २०११ ची लोकसंख्या १४ हजार २०० गृहित धरून पाण्याची आवश्यकता प्रतिदिवस ५ लाख ६८ हजार लिटर (दरडोई दरदिवस ४० लिटर) गृहित धरण्यात आली. ढोबळमानाने योजनेचा खर्च १६१.३५ लाख रुपये होता. त्यामध्ये प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात ५.० मीटर व्यास, १५ मीटर खोल पंपगृहासह जॅकवेल विहीर बांधण्यात आली. त्यावर ३५,५०० लिटर प्रतितास उत्सर्ग करणारे २० अश्वशक्तीचे २ व्ही.टी.पंप बसविण्यात आले. विहिरीपासून २ किमी अंतरावर बिहाडी रस्त्यावर ०.८६ दशलक्ष लिटर प्रतिदिवस क्षमतेचे जलशद्धीकरण केंद्र सुरू झाले. विहीरीपासून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत २०० मिमी व्यासाची ७ हजार ६२० मीटर लांब पाईपलाईन टाकण्यात आली. हस्तांतरण झाल्याने वारंवार होत असलेल्या लिकेज दुरुस्तीचा भुर्दंड ग्रा. पं. ला करावा लागतो. तत्कालीन कार्यकारी अभियंता आर. जे. जैन, सहाय्यक अभियंता हेमके, उपविभागीय अभियंता हुंगे यांच्या देखरेखीखाली ही योजना पार पडली. त्यांनी २२ मे २००१ ला कारंजा ग्रा.पं.ला योजना हस्तांतरित केली. त्यानंतर कारंजा व खैरी गावाला पाणीपुरवठा सुरू झाला. मुख्य म्हणजे ही जॅकवेल चुकीच्या जागी बांधण्यात आली. पाणी घेण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा योजनेसारखी (पूर्वीची नारा-२२) इनटेक विहीर बांधण्यात आली नाही. या जॅकवेलमध्ये सेलगांव(लवणे) च्या नदीवरुन येणारे पाणी जमा होते. पण त्या पाण्याचे व्यवस्थित शुद्धीकरण होत नाही. जॅकवेलचे दोन इनटेक चेंबर्स उघडे पडले आहे. हा जॅकवेल मोटरपंप खाली असल्यामुळे पाण्याचा पूर्णपणे उपसा होत नाही. विहीर चुकीच्या ठिकाणी बांधल्याने ती कालबाह्य झाली आहे. आता योग्य जागी व आधुनिक पद्धतीने धरणाजवळ नवीन विहीर व लगतच जलशद्धीकरण केंद्र उभारण्याची मागणी नागरिकांसह ग्रामपंचायतीचे सरपंच नितीन दर्यापूरकर, उपसरपंच नरेश चाफले सह सदस्यांनी केली आहे.
पाणी पुरवठ्याचे स्त्रोत झाले कालबाह्य
By admin | Updated: July 20, 2014 00:04 IST