वर्धा नदीचे अस्तित्व धोक्यात : महसूल प्रशासनाचे दुर्लक्षवर्धा : जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या वर्धा नदीच्या काठावरील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात रेती चोरी असताना त्यात माती चोरट्यांनीही भर घालत नदी पात्राचे काठ ओरबडायला सुरूवात केली आहे. परिणामी, या नदीचे अस्तित्व धोक्यात येत आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. वर्धा नदीचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी आता वीटभट्टीसाठी माती चोरणाऱ्यांवरही अंकुश लावण्याची गरज व्यक्त होत आहे. पुलगाव परिसरातील घाटातील अवैध रेती चोरी ही सर्वश्रुत आहे. याच्याच भरवशावर अनेकांनी आपले पर्यायी व्यवसायही थाटले आहेत. सर्वांच्या डोळ्यादेखत तस्करीचा सावळागोंधळ सुरू असताना अधिकारी त्याकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसते. आता परिसरात वीटभट्ट्यांचा व्यवसायही तेजीत सुरू आहे. अनेक विटाभट्टीधारकांनी नदीपात्राच्या काठावर, शासकीय जागेवर धुडगूस घालून माती चोरी सुरू केल्याचे दिसून येत आहे. परिसरातील मार्डा, सोरटा, पुलगाव, सौजना, आपटी, वाघोली, विटाळा, चाका, ओकनाथ येथील विटाभट्टीधारकांनी नदीचे काठ आणि शासकीय जमीन उखरून अवैधरीत्या माती चोरी सुरू केल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. दिवसरात्र मातीचोरी सुरू असल्याने माती माफीयांनी शासनाच्या महसुलाची लयलूट सुरू केल्याचेच दिसून येते. यामुळे महसूल विभागाला आता माती चोरट्यांवरही कारवाईचे अस्त्र उगारण्याची गरज निर्माण झाली आहे.(स्थानिक प्रतिनिधी)
रेतीसोबतच मातीची तस्करी
By admin | Updated: March 14, 2016 02:22 IST