वर्धा : महिलांना त्यांच्या लैंगिक शोषणाचा त्याचा प्रतिकार करण्यासाठी, याविषयी सजग करण्यासाठी तसेच लैंगिक शोषणाची सविस्तर माहिती करुन देण्यासाठी सामाजिक जाणीव जागृती अभियान राबविण्यात येत आहे. विद्यापीठ अनुदान आयोग, महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रियदर्शिनी महिला महाविद्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महिला तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली.प्रा. डॉ. अनिता देशमुख या अध्यक्षस्थानी होत्या. पुरुषांना आपण जे वागतोय त्यात लैंगिक शोषणाच्या व्याख्येत बसेल असे काही असू शकते याची जाणीव करुन देण्यात आली. समाजातील पुरुषांचे वैचारिक समज व मानसिकता स्त्रियांच्या दृष्टिने सकारात्मक करणे ही आजची गरज आहे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. या उद्देशाने कामाच्या ठिकाणी महिलांचा होणाऱ्या लैंगिक छळाविरुद्ध कायदा २०१३ चे वाचन करण्यात आले. यात प्रामुख्याने लैंगिक छळ म्हणजे काय, यामध्ये शारीरिक स्पर्श, लैंगिक प्रकारातील बोलणं, कामामध्ये लुडबूड करणे, लैंगिक साहित्य किंवा सामग्री दाखवणे, शिव्या उच्चारणे, शिटी वाजवणं, स्त्री सन्मानाला धक्का पोहचेल असे विनोद व संदेश पाठविणे, एखाद्या स्त्रीला पाहून गाणे म्हणणे, द्विअर्थी शब्द उच्चारणे, कामाच्या ठिकाणी भीतीदायक वातावरण तयार करणे, अमानवी व्यवहार करणे, अपमानास्पद वागणूक देणे, ज्यामुळे स्त्रियांच्या आरोग्यावर व सुरक्षितेवर परिणाम होईल इत्यादी बाबींचा अंर्तभाव असल्याचे सांगितले. याविरोधात महिलेने दिलेली तक्रार व पुरावे खोटे आढळून आल्यास तक्रारदाराविरुद्ध कामाच्या सेवा नियमावलीनुसार कारवाईची तरतुद असल्याची माहिती देण्यात आली. प्राचार्या डॉ. रंभा सोनाये यांनी मार्गदर्शन केले. समितीत डॉ. प्रतिभा ताकसांडे, डॉ. सोनाली सिरभाते, अॅड. अनिता ठाकरे यांचा समावेश आहे. शिक्षकेतर कर्मचारी दिनेश भगत, विद्यार्थिनीतून प्रिया वडेकर यांचा समितीत समावेश आहे.(स्थानिक प्रतिनिधी)
महिलांच्या लैंगिक शोषणाविरूद्ध सामाजिक जाणीव जागृती अभियान
By admin | Updated: February 14, 2017 01:31 IST