नि:शब्द मनाचा हुंकार...: युवतींच्या नेतृत्वातून महिलांवरील अत्याचार खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारावर्धा : कोपर्डी येथे झालेल्या अत्याचाराविरूद्ध पेटून उठलेला मराठा-कुणबी मूकमोर्चाचा नि:शब्द हुंकार रविवारी वर्धेकरांनी अनुभवला. केवळ नजरेत साठविलाच नाही तर त्यात सहभागी होत शिस्तबद्धता आणि मराठा-कुणबी मूकमोर्चाचा नवा आदर्शही घालून दिला. अत्यंत शिस्तबद्ध रितीने जुन्या आरटीओ मैदानातून निघालेला मोर्चा मार्गस्थ होत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर विसावला. दरम्यान, कुठेही बेशिस्त नाही की, हुल्लडबाजी नाही. हजारोंच्या जनसमुदायाचा हा लयबद्ध मोर्चा शासन, प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकरिता आदर्शवतच ठरावा.वर्धेत रविवारी मराठा-कुणबी क्रांती मूकमोर्चाचे आवाहन करण्यात आले. महिनाभर केलेली तयारी आज फळास आली. जुन्या आरटीओ मैदानातून मूकमोर्चाला प्रारंभ होणार होता. शहरात जत्थ्याने जरी मोर्चेकरी गोळा झाले नसले तरी जुन्या आरटीओ मैदानात पाहता-पाहता गर्दी झाली. दुपारी १ वाजेपर्यंत संपूर्ण मैदान व्यापले गेले होते. एवढा मोठा जनसमूदाय असताना कुठेही आरडाओरड वा किलबिलाट दिसून आला नाही. जुन्या आरटीओ मैदानात ‘डी’ आकारात स्टेज, सभामंडप, कठडे यांची व्यवस्था करण्यात आली होती. मंचकाच्या अगदी समोर उंचावर मचान उभारून छत्रपती शिवरायांचे तैलचित्र लावण्यात आले. सर्वत्र भगवे झेंडे, मागण्यांचे फलक आणि डोक्यावर मराठा-कुणबी मूकमोर्चा लिहिलेल्या टोप्या घातलेला जनसमूदाय शांततेत बसून होता. शेकडो स्वयंसेवकांमार्फत हा जनसमूदाय सांभाळला जात होता. प्रत्येकांपर्यत पाणी पाऊच पोहोचवित स्वयंसेवक सेवा देत असल्याचे दिसून येत होते. महिलांकरिता वेगळा सभामंडप तसेच बसण्याची अन्यत्र वेगळी व्यवस्था करण्यात आली होती. स्टेजच्या एका बाजूला महिला तर दुसऱ्या बाजूला पुरूष मंडळी स्थानापन्न होती. स्वयंसेवकांद्वारे मोर्चासाठी दूरवरून आलेल्या युवक, युवती, महिला, पुरूषांना सूचना केल्या जात होत्या. मूकमोर्चात सहभागी होण्यासाठी आलेल्या महिला, पुरूषांकडूनही कुठलाच गोंधळ झाल्याचे पाहावयास मिळाले नाही. सर्व शिस्तीचे पालन करीत स्थानापन्न होत होते. स्टेजच्या आजूबाजूला फडकणारे भगवे झेंडे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. डोक्यावर सूर्य तळपत असतानाही सकाळपासून आलेली मंडळी शांतपणे बसून मूकमोर्चा निघण्याची प्रतीक्षा करताना बघायला मिळाले. १ वाजून २७ मिनिटांनी मूकमोर्चाला प्रारंभ झाला. युवतींकडे नेतृत्व असलेल्या मूकमोर्चात स्वयंसेवकांनी मोलाची भूमिका निभावली. छत्रपती शिवरायांचा पुतळा ठेवलेल्या वाहनाच्या मागे युवती, त्यामागे महिला, मग युवक आणि पुरूष मंडळी तर मोर्चाला दोन्ही बाजूने सुरक्षा कवच देणारे स्वयंसेवक, हे दृश्य शिस्तबद्धतेचा परिचय देत होते. जुन्या आरटीओ चौकातून निघालेला मोर्चा आर्वी नाका चौकापर्यंत पोहोचत असतानाही मैदानात मात्र गर्दी जमलेलीच होती. शहरातील नागरिकही रस्त्यावर मूकमोर्चाच्या स्वागत आणि तो डोळ्यात साठविण्याकरिता रस्त्याच्या कडेला गर्दी करून होते. काही वर्धेतर मोर्चा स्थळापासून सहभागी झाले तर काही रस्त्यांवर थांबून मूकमोर्चाची प्रतीक्षा करताना दिसून आले. यामुळेच उत्तरोत्तर मूकमोर्चातील सहभागी जनसमूदाय वाढत गेला. मूकमोर्चातील प्रत्येक सहभागींच्या आरोग्याची, तहाण लागल्यास पाण्याची विचारणा करणारे स्वयंसेवक लक्ष वेधून घेत होते. प्रत्येक स्वयंसेवकाच्या हातात असलेले पाण्याचे पाऊच सहभागींची काळजी घेतली जात असल्याचेच सांगत होते. जुन्या आरटीओ मैदानातून निघालेला हा शिस्तबद्ध मोर्चा आर्वी नाका, शिवाजी चौक, बजाज चोकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत पोहोचला. दरम्यान, कुठेही शिस्त ढळली नाही. पोलीस यंत्रणेने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करीत हा मूकमोर्चा अत्यंत शांततेने मार्गस्थ झाला. यामुळेच वर्धेतील मराठा-कुणबी क्रांतीचे प्रतीक असलेला मूकमोर्चा शिस्तबद्धतेचा नवा आदर्श घालून देणारा ठरला.जाती-धर्मातील भेद, समाज भिन्नताही पराजितअमूक जातीचा मोर्चा आहे. मग, मी कशाला समोर जाऊ, मी का मदत करायची, हा भेद वर्धेकरांनी पळवून लावल्याचा अनुभव रविवारी आहे. मराठा-कुणबी क्रांती मूकमोर्चात सहभागींना पाण्याची कमतरता भासू नये, तहानेने कुणीही व्याकूळ होऊ नये, याची दक्षता घेण्यात आली. केवळ सामाजिक संघटना, संस्थाच नव्हे तर सर्वांनीच रस्त्यात सहभागींना पाणी पाऊच पुरवित एकतेचा परिचय दिला. कुठल्याही जाती, धर्माविरूद्ध नसलेल्या या मोर्चाला समाजातील हिंदू, मुस्लीम, व्यापारी, राजकीय संघटना या सर्वांनीच सहकार्य केले. जागोजागी पाण्याचे वितरण करण्यात आले. कुणी पाणी पाऊचची व्यवस्था केली तर कुणी थंड पाण्याचे जार ठेवून मोर्चेकरांची तृष्णातृप्ती केली. मराठा-कुणबी क्रांती मूकमोर्चामुळे वर्धेत जातीभेद, समाज भिन्नताही पराजित झाल्याचे दृष्टीस पडत होते.
नि:शब्द, शांत, शिस्तबद्ध आणि संयमी
By admin | Updated: October 24, 2016 00:24 IST