रामदास तडस : सुमारे पाच हजार लाभार्थ्यांना योजनांचा लाभ वर्धा : महाराजस्व अभियानांतर्गंत समाधान योजना शिबिर सर्वसामान्य जनतेची कामे तत्काळ होण्यासाठी वरदान आहे. समाजातील विविध घटकांसाठी विविध योजनांचा लाभ जनतेला मिळून त्यांना दिलासा देण्याचे कार्य या शिबिराच्या माध्यमातून होत असल्याचे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले. समुद्रपूर तालुक्यात महाराजस्व अभियान २०१५ अंतर्गत समाधान शिबिराचे आयोजन विद्या विकास महाविद्यालय येथील सभागृहात करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस होते. प्रमुख उपस्थिती आमदार समीर कुणावार, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, उपविभागीय अधिकारी घनश्याम भुगावकर, तहसीलदार सचिन यादव व सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. खासदार तडस म्हणाले, समाधान योजनेमार्फत शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यापर्यंत पोहचत आहेत. शासन लोकाभिमुख असून जनतेच्या जगण्यामध्ये शासनाची महत्वाची भूमिका आहे. परंतु प्रशासनाला लोकसहभागाची अपेक्षाही आहे. कारण कोणताही विकास लोकसहभागाशिवाय शक्य नसल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी समाधान शिबिराच्या यशस्वीतेकरिता विविध विभागाचे अधिकारी व पदाधिकारी यांच्यामध्ये समन्वय आवश्यक असल्याचे नमूद करून संपूर्ण जिल्ह्यात महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. एकाच छत्राखाली नागरिकांची सर्व कामे होत असल्यामुळे समाधानही व्यक्त केले. आ. कुणावार यांनी लोकांना किरकोळ कामांसाठी हेलपाटे घालावे लागू नये म्हणून शासनाने लोकांपर्यंत पोहचण्याची आणि लोकांशी संवाद साधण्याची उत्तम संधी या शिबिरामार्फत उपलब्ध करून दिली आहे. या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना प्रशासनामार्फत पोहचविण्याचा मानस आहे. यानुषंगाने समुद्रपूर व वायगाव गोंड या महसूल मंडळामध्ये सदर शिबिर राबविण्यात आले. भविष्यामध्ये सर्व मंडळनिहाय असा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी आशुतोष सलील म्हणाले, शेतकरी, शेतमजुरांसह जनतेचे समाधान झाल्यावरच विकास शक्य आहे. त्यामुळे सर्व जनतेने अशा शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी घनश्याम भुगावकर यांनी केले. प्रस्ताविकामध्ये अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या समाधान शिबिरातील विविध उपक्रमांबाबत तालुक्यातील सर्व कार्यालयाने राबविलेल्या योजनांची माहिती देण्यात आली. (शहर प्रतिनिधी)
सर्वसामान्यांची सेवा हीच ईश्वरसेवा
By admin | Updated: September 13, 2015 01:59 IST