नंदोरी : हिंगणघाट ते नंदोरी या महामार्गावरील सावली ते नंदोरी या मार्गाची अतिशय दैनावस्था झाली आहे. या मार्गाचे डांबरीकरण उखडले असून रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. यामुळे या मार्गाने वाहन चालविताना चालकांची तारांबळ उडते. तसेच अपघाताची शक्यता असल्याने या मार्गाची त्वरीत डागडूजी करण्याची मागणी होत आहे.हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. या मार्गाबाबत नागरिकांनी निवेदन दिले. मात्र याला केराची टोपली दाखविण्याचा प्रकार केला जातो. या मार्गावरील कडाजणा ते सावली या गावापर्यंत डांबरीकरण करण्यात आले. तर हिंगणघाट ते सावली रस्त्याचे गेल्या चार वर्षांपूर्वी रुंदीकरण करण्यात आले. पण सावली ते नंदोरी या पाच किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण अद्याप करण्यात आले नाही. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. या मार्गावरुन मोठ्या प्रमाणात जड वाहतुक होते. यात ट्रक, टेलर यासारखे वाहन समोरुन आल्यास अन्य वाहनधारकास रस्त्याच्या खाली वाहन उतरवावे लागते. एकावेळी एकच वाहन जाऊ शकेल इतका हा मार्ग अरूंद आहे. पावसाच्या दिवसात वाहनधारकास वाहन चिखलात फसल्यास वेगळाच त्रास सहन करावा लागतो. परिसरातील शेगाव, नारायणपूर, डोंगरगाव, मेंढूला, गोविंदपूर येथील नागरिकांसाठी हा अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गाने सतत वर्दळ असते. परंतू रस्त्याची दैनावस्था झाली असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.(वार्ताहर)
सावली-नंदोरी मार्गावर खड्ड्यांची मालिका
By admin | Updated: August 4, 2014 23:54 IST