वर्धा : पवनार येथील मुलांच्या प्राथमिक शाळेची इमारत ९२ वर्षांची झाली़ शंभरीकडे वाटचाल करणारी, उन्ह, वारा सहन करीत उभी असलेली ही इमारत जीर्ण झाली आहे. यामुळे इमारतीच्या काही भागाची दुरुस्ती करावी, इमारतीचा काही भाग पाडावा, असा प्रस्ताव शिक्षणाधिकारी (प्रा.) यांच्याकडे दोन वर्षांपूर्वी सादर केला; पण त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने तो धूळखात पडला आहे. पवनार येथील मुलांच्या शाळेची इमारत जीर्ण झाली आहे. शाळेचे छत कवेलूचे आहे. माकडांचा कायम हैदोस असतो. प्रत्येक पावसाळ्यात एकदा नव्हे तर वारंवार कवेलू फेरावे लागतात. हा त्रास कमी व्हावा व मुलांच्या जीविताला धोका लक्षात घेत शाळेची कायम दुरुस्ती करावी, यासाठी ८ सप्टेंबर २०१२ रोजी तत्कालीन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष अर्चना डगवार, उपाध्यक्ष गणेश बोरकर व अन्य सदस्यांच्या हजेरीत सभा झाली़ वर्गखोल्यांच्या खिडक्या, दरवाजे जिर्ण झाले आहे. वारंवार डागडुजी करावी लागते. यासाठी वार्षिक निधी अपूरा पडतो. यामुळे इमारतीच्या कायम दुरुस्तीबाबत चर्चा झाली़ पं़स़ गटशिक्षणाधिकारी दीपक साने यांनी शाळेची पाहणी केली. तत्कालीन कनिष्ठ अभियंता स्वाती भागवते यांनी केलेल्या पाहणीत शाळेची विदारक स्थिती दिसली़ यामुळे त्यांनीच शाळा दुरुस्तीबाबत सूचना देत आवश्यक फोटो काढून प्रस्ताव शिक्षणाधिकारी (प्राथ़) यांच्याकडे पाठविण्याचा ठराव संमत केला. यास मंजुरी मिळताच ठराव पं.स. गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुखांमार्फत शिकाणाधिकारी (प्रा.) यांच्याकडे पाठविला़ या प्रस्तावास दोन वर्षे लोटली; पण दुरुस्ती वा इमारत पाडण्याबाबत निर्णय झाला आहे. यामुळे हा प्रस्ताव संबंधितांकडे धूळखात पडल्याचेच दिसते़(शहर प्रतिनिधी)
दोन वर्षांपासून शाळा दुरुस्तीचा प्रस्ताव धूळ खात
By admin | Updated: September 18, 2014 00:01 IST