दोघींना मिळाला कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश इंझाळा : येथील शेतकरी महिला भावना शरद डहाके यांनी आत्महत्या केल्यानंतर निराधार झालेल्या दोन्ही मुलींच्या दहावीपर्यंतचा शिक्षणाचा खर्च परिसरातील नागरिकांनी स्वीकारला होता. त्यांनी या दोन्ही मुलींना कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश देत शालेय साहित्याचे वाटप जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे व पोलीस निरीक्षक मुरलीधर बुरांडे यांच्या हस्ते देण्यात आले. शेतातील नापिकी व कर्जबाजारीपणा यातून हतबल झालेल्या भावना डहाके यांनी विष पिऊन आपली जीवनयात्रा संपविली. तिच्या पाठीमागे तीन चिमुकल्या मुली होत्या. त्यांच्या शिक्षणाचा खर्च म्हणजेच शिक्षणासाठी दत्तक या परिसरातील चंद्रशेखर भेंडे, सचिन सुरेश, पंकज गावगे, गोपाल काळे, हेमंत तुपकरी, मयुर अवसरे, अमोल खोडे यांनी घेतला होता. या वर्षी शाळा सुरू होताच अक्षरा व गुंजन यांचा वर्ग प्रवेश कॉन्व्हेंटला करून दिली व शालेय साहित्यही त्यांना दिले. त्याचबरोबर यापुढे आरोग्यासाठी ही दत्तक घेत असल्याची ग्वाही शरद डहाके या त्या मुलींच्या वडिलांना दिली. जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे यांनी हाती घेतलेल्या या कामाचे कौतुक केले. पोलीस निरीक्षक बुराडे यांनी ही आत्महत्या ग्रस्त कुटुंबाला मी असे तो पर्यंत मदत करील अशी ग्वाही दिली. यावेळी गावकरी उपस्थित होते.(वार्ताहर)
आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्यांना शालेय साहित्य वाटप
By admin | Updated: August 5, 2016 02:08 IST