परत आलेल्या दुधाची बनतात पाकिटे : अन्न व औषधी प्रशासनाचे दुर्लक्षवर्धा : शासकीय दुग्ध डेअरीतून पिण्यास अयोग्य दुधाची सर्रास विक्री होत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे़ या दुधामुळे अनेक आजार जडण्याची शक्यता असताना त्याकडे कानाडोळा केला जात आहे़ विश्वासार्हता जपण्याची जबाबदारी असलेल्या शासनाच्याच दुग्ध डेअरीतूनच पिण्यास अयोग्य दुधाची पाकीटे तयार करून विकली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे़ येथील शासकीय दूध योजनेत ग्रामीण भागातील विविध दुग्ध संघांमार्फत सहा ते साडेसहा हजार लिटर दुधाचे दैनंदिन संकलन केले जाते़ एक दिवसाआड नागपूर येथील मनसर येथून १५०० ते १८०० लिटर दूध शासकीय संकलन केंद्राला प्राप्त होते़ या दुधाचे परीक्षण करून शासनामार्फत विक्री केली जाते़ सहा हजार लिटर दूध वितरित झाल्यानंतर ५०० ते ५५० लिटर दूध शिल्लक असते़ हे दूध आठ ते दहा दिवसांपर्यंत उच्च अधिकाऱ्यांच्या सूचनांवरून साठविले जाते़ दहा हजार लिटरपर्यंत दूध गोळा झाल्यानंतर ते दुसऱ्या युनिटला पाठविले जाते़ हे साठविलेले दूध पिण्यास अयोग्य झाल्यामुळे संबंधित युनिटकडून परत येते़ मग, साठविलेल्या शिळ्या दुधामध्ये पुन्हा ताजे दूध मिसळून त्याची पाकीटे तयार करून विक्रीस उपलब्ध केली जातात़ या धक्कादायक प्रकाराची खुद्द डेअरी अधिकाऱ्यानेच कबुली दिली आहे़दुसऱ्या युनिटकडून परत आलेले दूध कोणतेही कारण नसताना परत पाठविले जाते़ याबाबत कोणतेही लेखी स्वरूपाचे कागद देत नसतात, असा कांगावा दूध संकलन केंद्राचे अधिकारी करतात़ वास्तविक, सदर दुधात अनैसर्गिक चव व गंध येत असल्याने दूध परत केले जात आहे, असे नांदेड येथील संकलन केंद्राने केलेल्या पंचनाम्यात नमूद आहे़ सदर पंचनाम्याचे कागदपत्र हाती आल्याने हा प्रकार उघडकीस आला़ पिण्यास अयोग्य दुधाची ‘आरे’ या नावाने पाकीटे तयार करून विक्री करण्याचा गोरखधंदा येथे उघड झाला आहे़ पिण्यास योग्य नसलेल्या दुधाची शासकीय डेरीतून सर्रास विक्री होत असताना अन्न व औषधी प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे़ अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करणे व बालकांची विविध आजारांतून सुटका करणे गरजेचे झाले आहे़(कार्यालय प्रतिनिधी)
शासकीय डेअरीतून भेसळयुक्त दुधाची विक्री
By admin | Updated: November 19, 2014 22:44 IST