वर्धा : रस्ते परिवहन अधिकारी कार्यालयात नेहमी वर्दळ असते़ वाहन चालविण्याचे परवाने बनविण्यापासून जड वाहनांच्या परवानगीपर्यंतची कामे येथे केली जातात; पण या कार्यालयात अनागोंदीच अधिक होती़ यामुळे आयुक्तांनी कारवाईचा धडाका लावला़ याचा धसका सध्या सर्वच आरटीओ कार्यालयांनी घेतल्याचे दिसते़ वर्धा जिल्ह्याचे प्रशासकीय भवनातील आरटीओ कार्यालयही शिस्तीत आल्याचे दिसून येत आहे़प्रशासकीय भवनात असलेल्या आरटीओ कार्यालयात दोन अधिकारी वगळले तर अन्य कर्मचारी कोण, शिपाई कोण, अर्ज कुणाकडे द्यावा, तो अर्ज दलाल तर स्वीकारत नाही ना, आपण दलालाकडे तर अप्रत्यक्षरित्या आपली कागदपत्रे देत नाही ना आदी अनेक प्रश्न निर्माण होत होते़ या कार्यालयात गेलेला व्यक्ती गोंधळून जात होता़ यामुळे कार्यालयातील शिस्तच हरविल्याचा भास होत होता़ कर्मचाऱ्याच्या खुर्चीवर बसून बाहेरील दलाल कामकाज सांभाळतानाचे दृश्य येथे नवीन नव्हते़ काही वेळापूर्वी कार्यालयात अर्ज स्वीकारलेला व्यक्ती काही वेळाने बाहेर येऊन काम करताना दिसत असल्याने तो कर्मचारी की दलाल, हा प्रश्न उपस्थित होत होता़ प्रत्येक आरटीओ कार्यालयात ही अनागोंदी होती़ शिवाय लाचखोरीचे प्रमाण वाढले होते़ प्रत्येक बाबीतून पैसा मिळावा म्हणून दलालांमार्फत आलेली कामे स्वीकारली जायची़ही बाब लक्षात आल्यानेच आयुक्तांनी आरटीओ कार्यालयांना भेटी देण्याचे सत्रच अवलंबिले़ यात एका अधिकाऱ्यावर कारवाईही करण्यात आली़ या प्रकारामुळे सर्वच आरटीओ कार्यालयांत धास्ती पसरली़ वर्धा शहरातील अनागोंदी कारभार असलेले आरटीओ कार्यालयही यातून सुटले नाही़ सध्या कारवाईच्या धास्तीने वर्धा आरटीओ कार्यालयात बरीच सुधारणा झाल्याचे दिसते़ कार्यालयात कोण येतंय, कोण कुणाला भेटतो, कामे कशी चालतात यावर बारिक लक्ष ठेवले जात आहे़ या सुधारणांमुळे सदर कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला़(कार्यालय प्रतिनिधी)
आरटीओ कार्यालय आले शिस्तीत
By admin | Updated: December 21, 2014 23:04 IST