बोरगाव (मेघे) येथील नागरिक त्रस्त : एक महिन्याचा दिला अल्टिमेटम वर्धा : बोरगाव (मेघे) येथील नागरिकांना गत २० ते २५ वर्षांपासून रस्त्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. २००४ मध्ये खडीकरण केलेल्या रस्त्याचे अद्याप मजबुतीकरण करण्यात आले नाही. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. संबंधित विभागाने एक महिन्याच्या आत रस्त्याचे मजबुतीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत ग्रा.पं. सदस्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. गत २० ते २५ वर्षांपासून बोरगाव (मेघे) भागात राहणारे नागरिक रस्त्याची मागणी करीत आहे. ही बाब लक्षात घेत २००४ मध्ये या रस्त्याचे २४० मीटर लांब व ३ मीटर रूंद खडीकरण करण्यात आले. यानंतर लगेच मजबुतीकरण होईल, अशी अपेक्षा होती; पण ते करण्यात आले नाही. याबाबत वारंवार निवेदने देण्यात आलीत; पण कुठलीही कार्यवाही झाली नाही. या रस्त्याने दररोज १०० ते १५० दुचाकी, चारचाकी, तीन चाकी, शाळकरी मुलांची ने-आण करणारी वाहने, आॅटो दररोज ये जा करीत असतात. रस्त्यावरील धूळ घरांमध्ये जाते. परिणामी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्यावरील पूल नादुरूस्त असल्याने अपघात होतात. या रस्त्यावर दुचाकी धारकांचे नेहमीच अपघात होतात. ग्रा.पं. निवडणूक काळात रस्ता मजबुतीकरणाची ग्वाही देण्यात आली होती; पण अडीच वर्षे लोटूनही रस्ता झाला नाही. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी दीड महिन्यात तीन मीटर रूंदीचे सिमेंटीकरण करून द्यावे. एक महिन्यात काय कार्यवाही केली, याचा अहवाल द्यावा, अन्यथा ग्रा.पं. सदस्य पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी ६३ नागरिकांनी सह्यांसह ग्रा.पं. सदस्य व जिल्हाधिकारी यांना निवेदनातून केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
२० वर्षांपासून रस्त्याची प्रतीक्षा
By admin | Updated: February 15, 2017 02:16 IST