दुरूस्तीची मागणी : माजी आमदारांना निवेदनातून साकडे लोकमत न्यूज नेटवर्क तळेगाव (श्या.पं.) : येथील नागपूर रोड ते वच्छलाबाई गोहाड कला, वाणिज्य महाविद्यालयापर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. तसेच या मार्गावरील गिट्टी पूर्णपणे उखडली आहे. परिणामी, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून सदर मार्गाची तात्काळ दुरूस्तीची मागणी आहे. सदर मागणीचे निवेदन माजी आमदार दादाराव केचे यांना देण्यात आले. नागपूर रोड पासून ते वच्छला गोहाड कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयापर्यंतचा हा मुख्य रस्ता १८ मीटर रूंदीचा आहे. त्याची लांबी जवळपास ६०० मीटर आहे. परंतु, या मार्गावरील गिट्टी अल्पावधीतच उघडी पडली आहे. त्यामुळे वाहनचालकांसह सर्वसामान्यांनाही याचा चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. वच्छलाबाई गोहाड कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयापर्यंतचा रस्ता काकधरा पुनर्वसन ग्रा.पं. कडे येतो. या मुख्य रस्त्याच्या एका बाजूस काकडदरा पुनर्वसनची वसाहत असून एका बाजूस तळेगाव ग्रा.पं. ची अतिक्रमीत वसाहत आहे. महाविद्यलय ग्रा.पं.ला करही अदा करते. गत वर्षी पं.स. आष्टीच्या माध्यमातून नागपूर रोड ते बाबाराव बैस यांच्या घरापर्यंतच्या मार्गाचे खडीकरण करण्यात आले. परंतु, सदर मार्गाने जड वाहने मोठ्या संख्येने ये जा करीत असल्याने अल्पवधीतच या रस्त्याचे तिन-तेरा वाजले. या रस्त्याने साथे पायी चालणेही कठीण झाले आहे. या मार्गाने ये-जा करणारे रस्त्याच्या दैनावस्थेमुळे मेटाकुटीस आले आहेत. नागरिकांसह विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ग्रा.पं. प्रशासनाने याकडे लक्ष देत सदर रस्त्याचे मजबुतीकरण करून डांबरीकरण अथवा सिमेंटीकरण करावे अशी मागणी निवेदनातून या भागातील नागरिकांनी केली आहे.
काकडदरा पुनर्वसनातील रस्त्याची दुरवस्था
By admin | Updated: May 17, 2017 00:38 IST