सेलू : करार संपलेले, रस्त्यासाठी लागलेला निधी कधीचाच वसूल झाल्याच्या कारणातून राज्यातील अनेक टोलनाके बंद करण्यात आले़ यामुळे वाहन चालकांना टोल वसुलीपासून मुक्ती मिळाली खरी; पण येळाकेळी येथील टोलनाका आजही वाहन चालकांत धास्ती निर्माण करताना दिसतो़ येथील पथकर वसुली बंद होऊन मोठा कालावधी लोटला; पण नाक्याची इमारत अद्यापही कायम आहे़ ही इमारत जैसे थे ठेवण्यामागे प्रशासनाचा हेतू काय, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे़ येळाकेळी येथील टोलनाका गत काही वर्षांपूर्वी बंद झाला; पण या मार्गावर टोल वसूल केला जात होता, साक्ष आजही ती इमारत देत आहे़ सदर इमारत उभी ठेवण्यामागचे नेमके कारण काय, हा संशोधनाचा विषय ठरू पाहत आहे. वर्धा ते आर्वी मार्गावर येळाकेळी गावानजीक रस्त्याच्या मधोमध ही टोल नाक्याची वास्तू उभी आहे. याच टोलनाक्यावर गत १२ ते १५ वर्षांपूर्वी वाहन धारकांकडून पथकर वसूल केला जात होता; पण ही वसुली गत काही वर्षांत बंद करण्यात आली आहे़ यानंतर येळाकेळी येथील धाम नदीवर नवीन पुलाचे बांधकाम झाले. आर्वीकडे जाणाऱ्या मार्गाचे रूंदीकरण व नव्याने डांबरीकरण करण्यात आले; पण या टोलनाक्याची वास्तू हटविण्यात आली नाही. याच रस्त्यावर जड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते़ या वास्तूच्या दोन्ही बाजूने असलेले अरूंद रस्ते वाहतुकीला अडचणीचे ठरत आहे.वर्धा ते नागपूर मार्गावरील महाबळा नजीकचा टोलनाका बंद होताच अवघ्या दोन महिन्यांत ती वास्तू धाराशाही करण्यात आली़ यामुळे येथे काहीच नव्हते, असा भास होतो; पण येळाकेळी येथील ही वास्तू प्रदीर्घ काळानंतरही ताठ मानेने आजही उभी आहे़ यामुळे पुन्हा कधीतरी याच इमारतीतून पथकर वसूल करण्याचे उद्दिष्ट तर नाही ना, असा संशयही व्यक्त केला जात आहे. रस्त्याच्या मधोमध असणारी ही वास्तू कशासाठी, हा प्रश्न सर्वांनाच बुचकाळ्यात टाकणारा आहे़ सार्वजनिक बांधकाम विभागाचे या वास्तूवरील प्रेम कमी का होत नाही, हा प्रश्नही चर्चिला जात आहे़ टोलनाक्याच्या या अवशेषामुळे वाहतुकीला मात्र अडचण निर्माण झाली आहे़ ही वास्तू हटविण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ व वाहन धारक करीत आहेत़(शहर प्रतिनिधी)
पथकर बंद; पण वास्तू कायम
By admin | Updated: April 26, 2015 01:35 IST