पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : अतिक्रमण हटविण्याची मागणी वर्धा : वाढत्या नागरिकरणामुळे शहरात गजबज वाढली आहे. जागा मात्र तेवढीच असल्याने पर्याय म्हणून अनधिकृत अतिक्रमण होत आहे. विशेष म्हणजे अनेक गल्लीबोळे खालून मोकळे असले तरी वरच्या बाजूने अतिक्रमणधारकांकडून झाकोळले गेले आहे. नगर परिषद प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने रस्त्यांचे रुपांतर चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये होत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ या काही वर्षात अतिशय गजबजून गेली आहे. दुकानांच्या रांगाच्या रांगा येथे पहावयास मिळतात. त्यामुळे वाहेने घेऊनच नाही तर काही रस्त्यांवर पायी चालणेही कठीण झाले आहे. त्यातच अनेकांची जुनी घरे पाडली जाऊन तेथे आता पक्की काँक्रीटची घरे निर्माण होत आहे. या रस्त्यांच्या बाजूला असलेल्या लहान रस्त्यांचा वापर आता प्रसाधनासाठी तसेच वाहने उभी करण्यासाठी होत आहे. त्यामुळे शहरातील अनेक रस्ते दुर्लक्षित झाले आहे. नेमका याचाच फायदा घेत अनेक नागरिकांनी वरच्या बाजूने घरे रस्त्याच्या कडेला वाढवून अतिक्रमण केले आहे. वरवर पाहता हे अतिक्रमण लक्षात येत नसले तरी वर पाहिल्यावर मात्र रस्त्याच्या बाजूने वरून पुढे आलेली घरे एकमेकांना चिकटत असल्याचे दिसते. त्यामुळे कधीकळी वरूनही मोकळे असणारे रस्ते आता झाकोळले गेले आहेत. सतत गरिबांच्या अतिक्रमण काढत असलेल्या पालिका प्रशासनाला हे अतिक्रमण दिसत नाही का असा प्रश्न उपस्थित होतो.(शहर प्रतिनिधी)
अतिक्रमणामुळे रस्ते झाकोळले
By admin | Updated: January 9, 2016 02:33 IST