संध्या रायकर : महाराष्ट्र स्टेट ज्युडीशीयल स्टेनोग्राफर असोसिएशनची पहिली महासभा वर्धेत वर्धा : न्यायाधीश न्यायदान करतो, मात्र त्याच्या निर्णयाचा शब्द न शब्द कागदावर उतरविण्याची महत्त्वाची जबाबदारी लघुलेखकाला पार पाडावी लागते. त्याच्या आणि न्यायाधीशाच्या शब्दात फरक पडला तर घोळ होण्याची शक्यता अधिक असते. यामुळे न्यायालयातील लघुलेखक हा न्यायाधीशाचा उजवा हात आहे, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संध्या डी. रायकर यांनी केले. येथील शिववैभव सभागृहात महाराष्ट्र स्टेट ज्युडीशीयल स्टेनोग्राफर असोसिएशन मुख्यालय चंद्रपूर शाखा वर्धाद्वारे रविवारी महासभा आयोजित करण्यत आली होती. या वेळी प्र्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. व्यासपिठावर महसभेचे अध्यक्ष म्हणून संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र ढवळे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा न्यायाधीश-१ व अति.सत्र न्यायाधीश अनिरूद्ध एम. चांदेकर, दिवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस.एन. राजुरकर, न्यायालय व्यवस्थापक सुनील पिंपळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना, न्यायाधीश रायकर म्हणाल्या, औरंगाबाद येथे न्यायाधीश म्हणून कार्यरत असताना न्यायदानासह लघुलेखक नसल्याने लिखाण काम दोन्ही भूमिका बजावाव्या लागल्या. त्यामुळे लघुलेखकाच दुखणं काय, याची जाणीव झाली. सध्या संगणकीय युग आल्याने लघुलेखकांनी आपले ज्ञान अद्यावत ठेवत खरेपणा, सचोटी आणि गोपनियता राखावी असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला. शिवाय लघुलेखकांच्या मागण्यांची पूर्तता होवो अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी न्यायाधीश चांदेकर यांनी न्यायाधीशाच्या डोक्यातील विचार कागदावर उतरविण्याची किमया लघुलेखकांनी साधली असे विचार व्यक्त केले. न्यायाधीश राजुरकर यांनी लघुलेखकांनी आपल्या जबाबदाऱ्या व मर्यादा जाणून घेत इंग्रजीचे सखोल ज्ञान, व्याकरण, शब्दसंग्रह यासह विविध माध्यमातून आपले ज्ञान अद्यावत करावे असे सांगून आयोजनाच्या सफलतेबाबत धन्यता व्यक्त केली. या महासभेला संघटनेचे सहकार्यकारी अध्यक्ष बबन वाबळे, महासचीव श्रीपाद पाटील, वर्धा शाखा अध्यक्ष श्रीराम साखरकर यांच्यासह राज्यभरातून विविध जिल्ह्यातील पदाधिकारी, लघुलेखक व सेवानिवृत्ती लघुलेखक उपस्थित होते. आयोजकांनी मान्यवरांचे स्मृतिचिनह देत तर उपस्थितांचे पुष्पगुचछ देत स्वागत केले. या महासभेला राज्यातील प्रतिनिधींची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)
लघुलेखक न्यायाधीशाचा उजवा हात
By admin | Updated: February 27, 2017 00:30 IST