वाघोली येथील प्रकार : स्थानिक तसेच जिल्हा प्रशासनाचेही दुर्लक्ष वर्धा : जिल्हा प्रशासनाला महसूल देणाऱ्या गावांचा विकास प्राधान्याने करणे अपेक्षित असते; पण जिल्ह्यात नेमके उलट होत आहे. रेती घाटांद्वारे महसूल मिळवून देणारी गावेच भकास होत असल्याचे दिसते. प्रशासनाने याकडे लक्ष देत उपाययोजना आखणे गरजेचे झाले आहे. रेतीघाट असलेल्या गावांना सुविधा पुरविणे गरजेचे असताना त्या गावांना रस्त्यांपासूनही वंचित ठेवले जात असल्याचे दिसते. हा प्रकार आर्वी, आष्टी, हिंगणघाट आणि देवळी तालुक्यातील बहुतांश रेतीघाट असलेल्या गावांबाबत पाहावयास मिळतो. आष्टी तालुक्यातील गोदावरी गाव विकासापासून वंचित आहे. देवळी तालुक्यात वाघोली या गावात जाणाऱ्या रस्त्याला अवकळा आली आहे. गत कित्येक वर्षांपासून या रस्त्याची दुरूस्ती करण्यात आलेली नाही. शिवाय याच मार्गावरील निमगव्हाण, बाभूळगाव आदी गावांतही समस्यांचा डोंगर आहे. महसूल देणारी गावे चकाचक करण्यासाठी प्रशासनाने प्राधान्यक्रम ठरविणे गरजेचे झाले आहे. धाटधारकांच्या साह्याने या गावांत विशेष विकास कामे राबविली जावीत, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.(कार्यालय प्रतिनिधी) वाघोली, वडगाव, निमगव्हाण, गोदावरी गावांत समस्यांचा डोंगर महसूल देणाऱ्या गावांमध्ये विकास कामे करण्याची जबाबदारी प्रशासनाने पार पाडणे गरजेचे आहे. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घेत गावातील विकास कामांचे प्रस्ताव जिल्हा दरबारी सादर करणे गरजेचे असते; पण असा प्रयत्नच होत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, बहुतांश महसूल देणारी गावे विकासापासून वंचित असल्याचेच पाहावयास मिळते. गावात सिमेंटचे रस्ते; पण गावात जाणारा मुख्य रस्ता खड्डेमय, अशी स्थिती आहे. परिणामी, ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत असून याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पुलगाव-दहेगाव रस्त्याचे काम संथगतीने बाभूळगाव, निमगव्हाण व वाघोली घाटातील रेती भरलेली अवजड वाहनांची पुलगाव-दहेगाव मार्गाने वाहतूक होते. शिवाय अन्य जड वाहतूकही सुरू असते. या मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली होती. यामुळे पुलगाव ते वाघोलीपर्यंत रस्त्याच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे; पण ते अत्यंत संथगतीने सुरू आहे. परिणामी, ये-जा करणाऱ्या ग्रामस्थ तथा अन्य वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
महसूल देणारी गावेही रस्त्याविना
By admin | Updated: March 30, 2017 00:34 IST