वर्धा, सिंदी (रेल्वे) : एका सहा वर्षीय मुलीला घरी कोणीही नसल्याची संधी साधून उचलून दूरवर नेले. मार सोसण्याचे तिचे वय नसताना तिला गंभीर मारहाण केली. इतकेच नव्हे, तर तिचे तोंड दाबून तिच्याशी कुकर्म केले. समाजमन सुन्न करणाऱ्या सिंदी (रेल्वे) येथील या प्रकरणात पीडिताच्या वडिलाने दोघांना घटनास्थळी बघितल्याचे तो ठासूनही सांगत आहे. असे असताना पोलीस केवळ एकावरच कारवाई करून मोकळे झाले. पीडिताही दोन बोटे दाखवून दोघे होते काय, असे विचारल्यावर त्याला सकारात्मक प्रतिसाद देते. मग पोलिसांकडून दुसऱ्याला अभय देण्याचे काय कारण, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शुक्रवारी काही सामाजिक संघटनेचे पदाधिकारी पीडिताच्या प्रकृतीची विचारपूस करायला गेले असता त्यांना भेटण्यास पोलिसांनी मज्जाव केला.सध्या पीडितावर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात येताच शुक्रवारी एका महिला सामाजिक व इतर संघटनांचे पदाधिकारी मुलीला शासकीय नियमानुसार काही मदतीची गरज आहे काय, या अनुषंगाने तिच्या कुटुंबीयांना भेटायला गेले असता तिथे असलेल्या पोलिसांनी भेटण्यास साफ नकार दिला. यावरुन सदर प्रकरण पोलीस कशाप्रकारे हाताळत आहे, याची कल्पना येते. यानंतर मुलीच्या वडिलाला भेटण्यासाठी बोलावणे पाठविले. तब्बल दीड तासांनी वडिल आणि आजी त्यांना भेटण्याकरिता आले असता त्यावेळी ते प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत होते. आता कुणावरही विश्वास राहिला नाही, अशा शब्दात आपली व्यथा त्यांनी मांडली, अशी माहिती सत्यशोधक महिला प्रबोधिनीच्या प्रा. नुतन माळवी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. यावेळी त्यांच्यासह श्रेया गोडे, किसान अधिकार अभियानचे अविनाश काकडे, मुस्लीम संघटनेचे अमीर अली अजानी, पलेरिया ही मंडळीही होती.सदर प्रकरणामुळे पीडिताचे कुटुंबीय कमालीचे धास्तावले आहे. अत्याचार झाल्यानंतर त्याची दाद मागायलाही मुभा नसल्याच्या परिस्थितीशी त्यांची एकाकी झुंज असल्याचे विदारक वास्तव या घटनेने पुढे आले आहे.या घटनेचा तपास सिंदी(रेल्वे) पोलिसांनीच केला असता तर त्यांनी याप्रकरणात हयगय केली, असे म्हणता आले असते. मात्र खुद्द उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याचा प्रभार असलेले पोलीस उपअधीक्षक (गृह) रवींद्र किल्लेकर यांनी सिंदीत ठाण मांडून संपूर्ण कारवाई प्रत्यक्ष केली. त्यांनाही पीडिताच्या पित्याचा कळवळा कळू नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अशा गंभीर प्रसंगातून गेल्यानंतर पीडित चिमुकलीचा जीव वाचणार, याची कुणालाही शाश्वती नव्हती. सेवाग्राम रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करीत तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून तिला जीवनदान दिले. तिच्याजवळ तिचे वडिल आणि तिची आजी आहे. हे दोघेही तिला विचारतात तेव्हा ती चिमुकली दोघेजण असल्याचे सांगत आहे. इतकेच नव्हे, तर त्यांचे वर्णनही करीत असल्याचे तिच्या वडिलाने व आजीने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. पोलिसांनी बयान घेतानाही तिला हाताची दोन बोटे दाखविताच तीने होकार दर्शविल्याचेही त्यांचे म्हणणे आहे, असे असताना कारवाई एकावरच का केली गेली, याचे उत्तर पोलीस प्रशासनाने देण्याची मागणी आता पुढे येत आहे. या प्रकरणात आता पोलीस आता काय भूमिका घेतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. सदर प्रकरणी पुन्हा समाजिक संघटना पुढे येणार असल्याचे संकेत मिळाले आहे. (लोकमत चमू)
चिमुकल्या निर्भयाला भेटण्यास पोलिसांचा मज्जाव
By admin | Updated: August 23, 2014 01:59 IST