वर्धा : नजीकच्या सावंगी (मेघे) ग्रामंचायत परिसरात डेंग्यू आजाराने थैमान घातले आहे. अनेकांना आजाराची लागण होत आहे. यात एकास जीवही गमवावा लागला. परिसरातील अस्वच्छतेमुळे आजार बळावत आहे. सरपंच, सचिव आणि आरोग्य कर्मचारी यांच्या दुर्लक्षितपणामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. त्यामुळे त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा अशी मागणी सावंगी येथील ग्रामपंचायत सदस्यांनी निवेदनाद्वारे जिल्हा हिवताप अधिकारी व जि. प. मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनानुसार डेंग्यू आजाराने समता नगर, येथील रमेश बापुराव तुपसौंदर्य या तरूणाचा २६ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. भारत गोटे आणि गौरव बडवाईक हा दोघांनाही डेंग्यूची लागण झाली होती पण उपचाराने ते थोडक्यात बचावले. ग्रा़पं़ च्या निष्काळजीपणामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे़ यासंदर्भात सावंगी (मेघे) ग्रामपंचायत सदस्यांनी जि़ प़ चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांना तक्रारही दाखल केली आहे. तक्रारीनुसार सावंगी (मेघे) परिसरात डेंग्यूची साथ सुरू होण्यापूर्वी म्हणजेच जवळपास चार महिन्यापूर्वी प्रत्येक आमसभेत आरोग्य विषयक योजना राबविण्यात याव्या, अशी मागणी करण्यात आली़ सोबतच ग्रामपंचायतमध्ये असलेल्या आरोग्य बुकामध्ये अशा सूचना सुद्धा नमूद करण्यात आल्या आहेत़ परंतु ग्रामपंचायत सरपंच सरिता किशोर दौड व सचिव संजय मोरे यांनी याकडे दुर्लक्ष केले़ एवढेच नव्हे तर ग्रामपंचायतच्या मालकीची असलेली फॉगिंग मशीन माजी सरपंच मनोज तायडे यांच्याकडे पडून असल्याने जवळपास वर्षभरापासून धुरळणी करण्यात आली नाही़ या संदर्भात पं. स. चे विस्तार अधिकारी देवतळे यांनी चौकशी केली असता त्यांच्यासुद्धा ही बाब लक्षात आली. ग्रामपंचायत प्रशासनाने आरोग्य विषयक योजना परिसरात योग्यप्रकारे राबविल्या नसल्याचे त्यांनी सांगितले़ग्रा.पं.ला चार महिन्यांपूर्वी जिल्हा हिवताप अधिकारी यांच्याकडून पत्र आले तरीही प्रशासनाकडून कोणतीही आरोग्य विषयक प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली नाही़ या कारणाने सरपंच व सचिव यांच्या निष्काळजीपणामुळे सावंगी (मेघे) परिसरात डेंग्यूचा प्रसार वाढला़ सावंगी (मेघे) परिसरात जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी जि़ प़ आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य कर्मचारी नगराळे यांच्यावर टाकली आहे़ परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारचे आरोग्य विषयक प्रतिबंधनात्मक उपाय वा कार्यक्रम राबविले नसल्याचे निवेदनात नमूद आहे. कुठलीही प्रतिबंधनात्मक कार्यवाही न करता पदाचा दुरूपयोग करीत असल्याचा आरोप ग्रा.पं. सदस्य करीत आहे. डेंग्यू आजाराच्या साथीसंदर्भाने २ आॅक्टोबर २०१४ रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी चव्हाण यांना ग्रामपंचायत सदस्य अमरजीत फुसाटे यांनी फोनद्वारे माहिती दिली आहे़ त्यावरून जिल्हा हिवताप अधिकारी मोनिका चारमोडे व तालुका अधिकारी सुनितकरी यांच्या आरोग्य चमूने परिसराची पाहणी केली़ यावेळी ग्रा.पं.ने आरोग्य विषयक योजना परिसरात राबविल्या नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. सदर परिसरात आरोग्य विषयक कोणतीही कामे सचिव मोरे व सरपंच दौड यांनी न राबविल्यामुळे डेंग्यूची साथ पसरली आहे़ त्यामुळे यासाठीच जबाबदार असलेल्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी जिल्हा हिवताप अधिकारी मोनिका चारमोडे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. शिष्टमंडळात समाधान पाटील, वणिता जाधव, सरिता पारधी, उमेश जिंदे, मीनाक्षी जिंदे, रमा सोनपितळे, महेंद्र गेडाम यांचा समावेश होता.(शहर प्रतिनिधी)
मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा
By admin | Updated: November 22, 2014 01:39 IST