पुरुषोत्तम मडावी :आजराबाबत जनजागृती आवश्यक वर्धा : सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमातील महत्त्वपूर्ण बदल म्हणून रुग्णांना आता त्याच्या वजनावर आधारित दररोज उपचार पद्धती देण्यात येत आहे. याचा फायदा रुग्णांना देवून त्यांना क्षयमुक्त करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी केले. सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा क्षयरोग कार्यालय, सामान्य रुग्णालय येथे नवीन उपचार पद्धतीचा प्रारंभ करण्यात आला. उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. राज गहलोत, डॉ. वाघमारे, डॉ. मानकर, डॉ. स्वाती पाटील उपस्थित होते. यावेळी पहिल्या क्षयरुग्णाला दररोज उपचार पद्धतीची औषधी देण्यात आली. जिल्हा क्षयरोग केंद्र वर्धा येथील प्रयोगशाळेमध्ये एलईडी मायक्रोस्कॉपीचे उद्घाटन डॉ. मडावी यांचे हस्ते यावेळी करण्यात आले. जिल्हा क्षयरोग केंद्र येथे दररोज उपचार पद्धती मधील घ्यावयाची काळजी व माहिती संपूर्ण लोकांपर्यंत आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात यावी, असे आवाहन डॉ. दुर्योधन चव्हाण यांनी केले. तसेच डॉ. डवले, डॉ. निवृत्ती राठोड, डॉ. राज गहलोत, डॉ. वाघमारे यांनी केले. दररोज उपचार प्रणालीची जिल्ह्यातील यंत्रणेबाबत माहिती देवून रुग्णांना वेळीच निदान व औषधोपचार कशा पद्धतीने करण्यात येईल याविषयी मार्गदर्शन केले. क्षयरोगाविषयी समाजात असणारे गैरसमज व शासनामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सुविधा, मोफत निदान व औषधोपचार याविषयी समाजात जनजागृती करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. ही मोहीम पुढे अशीच चालू ठेवावी, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर भाषण जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. स्वाती पाटील यांनी केले. संचालन संजीव शेळके यांनी तर आभार डॉ. सिमा मानकर यांनी मानले. यशस्वीतेकरिता बाखडे, जगताप, दुबे, बेलूरकर, वैरागडे, वासनिक, सोनटक्के, पुनवटकर, राठोड, अख्तर शेख, दाभाडे तसेच नर्सिंग स्कूलच्या प्राचार्या व विद्यार्थ्यांनी व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)
नव्या उपचार पद्धतीने रुग्णांना क्षयमुक्त करा
By admin | Updated: February 22, 2017 00:53 IST