नागरिकांचे आरोग्य धोक्यात : संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी आर्वी : तालुक्यातील १५ गावांचे आर्वीलगतच पुनर्वसन करण्यात आले; परंतु पुनर्वसन झाल्यापासून निम्नवर्धा विभागाने या गावात ब्लिचिंग पावडरचा पुरवठा केला नाही. परिणामी गावकऱ्यांना स्वत: अधिक भावाने बाजारातून ब्लिचिंगची खरेदी करून पाणी शुद्ध करावे लागत आहे. आर्वी तालुक्यातील निंबोली (शेंडे) येथील गावातील जीर्ण पाण्याची टाकी पाडल्याने बोअरींगमधून गावाला पाणी पुरवठा होतो. या बोअरींगचे पाणी शुध्द नसल्याने सध्या या पाण्यामुळे गावात साथीच्या आजाराची भीती वर्तविली जात आहे. पुनर्वसन झालेल्या सर्कसपूर येथील गावात पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी नियमित धुतल्या जात नाही. या गावाला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन जागोजागी फुटल्याने ७५० लोकवस्तीच्या गावात काही भागात पाणी पुरवठा होत नसल्याने खोदलेल्या खड्ड्यातून पाणी भरावे लागते आहे. पुनर्वसन गावातील अहिरवाडा, राजापूर, वाढोडा, इटलापूर येथील गावकरी व ग्रामपंचायत संघटना गावकऱ्यांच्या पुढाकाराने ब्लिचिंग पावडरची खरेदी करते. गत आठ वर्षांपासून राजापूर ग्रामपंचायतने या ब्लिचिंग पावडर पुरवठ्याची मागणी करूनही पावसाळ्यापूर्वी ब्लिचिंग पावडर वेळेवर दिले नाही. पुनर्वसन गावात शुध्द पाणी पुरवठा होत नसल्याने पंचायत समिती विभागाने या पुनर्वसन गावात मुलभूत सोई सुविधा पुरवाव्या, अशी मागणी होत आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजाराला पुनर्वसन गावातील सदोष पाणी पुरवठ्याची जागोजागी फुटलेली पाईपलाईन सांडपाण्याने वाहून जाण्यासाठी नाल्याच नसल्याने पावसाळ्यात पुनर्वसन गावाचा आरोग्याचा प्रश्न दरवर्षी गंभीर होतो. गत आठ ते दहा वर्षांपासून आर्वी तालुक्यातील या पुनर्वसन गावांचे प्रश्न सदोष पाणीपुरवठा योजना व सांडपाण्याचे योग्य नियोजन केले नसल्याने दरवर्षी गंभीर होत आहे. यावर पुनर्वसन विभागाने लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांची आहे.(तालुका प्रतिनिधी) गावात ब्लिचिंग पावडरचा पुरवठा अनियमीत होतो. पिण्याच्या पाण्याची टाकी धुतल्याच जात नाही. पाणी पुरवठ्याची पाईप लाईन जागोजागी फुटली आहे. - निखील कडू, उपसरपंच, सर्कसपूर, ता. आर्वी. राजापूर गावात गत आठ-दहा वर्षांपासून ब्लिचिंग पावडरचा पुरवठाच होत नाही. आम्ही गावकरी बाजारातून अधिक भावाने ब्लिचिंग पावडर खरेदी करतो. संबंधीत पुनर्वसन विभागाला वारंवार मागणी करूनही पुरवठा होत नाही. त्यामुळे पावसाळ्यात आरोग्याचा प्रश्न गंभीर बनतो. - प्रा. धमेंद्र राऊत, अध्यक्ष सरपंच संघटना, वर्धा
पुनर्वसित गावे ब्लिचिंग पावडरविना
By admin | Updated: August 10, 2016 00:31 IST