लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विलीनीकरणासह पगारवाढ तसेच विविध मागण्यांसाठी दिवाळीपूर्वी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनात सुरूवातीस रापमच्या वर्धा विभागातील तब्बल १ हजार ४०३ कर्मचारी सहभागी झाले होते. पण नंतर पगारवाढ मान्य करीत तसेच विविध कारणांमुळे २६३ कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाले आहेत. असे असले तरी अजूनही १ हजार १०० कर्मचारी विलीनीकरणासाठी काम बंद आंदोलनात सहभागी होऊन लढा देत आहेत.उल्लेखनीय म्हणजे आतापर्यंत रापमच्या जिल्ह्यातील पाच आगारातील आंदोलनकर्त्या तब्बल २१९ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यात १५८ कायमस्वरूपी कर्मचारी असून त्यांच्यावर निलंबनाची तर ६१ रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर रुजू व्हावे असे आवाहन रापमच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. असे असले तरी अजूनही आंदोलनकर्ते कर्मचारी आपल्या चार महत्त्वाच्या मागणींवर ठाम आहेत. या आंदोलनामुळे रापमच्या बसेस आगारातच उभ्या असून रापमचे अर्थचक्रच थांबले आहे.
रापमची प्रवासी वाहतूक सुरू व्हावी
कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे राज्य परिवहन महामंडळाची प्रवासी वाहतूक सेवा बंदच आहे. इतकेच नव्हे तर कोविड काळात सुरू करण्यात आलेली मालवाहतूकही बंद आहे. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. सुरक्षित प्रवास अशी ओळख असलेली रापमची प्रवासी वाहतूक सेवा लवकरात लवकर सुरू व्हायला हवी.- मुरलीधर नगराळे, प्रवासी.
विविध साहित्य खरेदी करण्यासाठी आम्हाला ग्रामीण भागातून तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या स्थळी यावे लागते. वृद्धांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये प्रवासी भाड्यात सवलत मिळते. पण सध्या बसेस बंद असल्याने जादा प्रवासी भाडे देऊन खासगी वाहनांनी ये-जा करावी लागत आहे. रापमची प्रवासी वाहतूक लवकर सुरू व्हायला पाहिजे.- सुभाष घायवट, शेतकरी.