लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यातील गारठ्यात वाढ झाली आहे. शिवाय ढगाळी वातावरण कायम असताना मंगळवारी रात्री आणि बुधवारी दुपारी जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. यामुळे गारठ्यात वाढ झाली असून कापूस, तूर, गहू तसेच भाजापाला वर्गीय पिकांना याचा चांगलाच फटका बसला आहे.वर्धा शहरासह परिसरात मंगळवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास आणि बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पावसाची रिपरिस सुरू होती. अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्याच्या कडेला विविध साहित्य विक्री करणाऱ्यांची एकच तारांबळ उडाली होती. सेवाग्राम भागातील हमदापूर, कोपरा, चाणकी या भागात बऱ्यापैकी पाऊस झाला. सध्या शिवनगर ते हमदापूर या मागार्चे काम सुरू असून ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. अशातच या मागार्ने ये-जा करणाऱ्यांच्या वाहनांच्या चाकांना ओली माती चिकटल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. तर काही दुचाकी घसरल्याच्याही घटना घडल्या. परंतु, प्रकरण पोलीस कचेरीपर्यंत पोहोचले नाहीत. हिंगणघाट शहरासह परिसरात मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे तालुक्यातील कपाशी, तूर आणि चणा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. समुद्रपूर तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसाच्या सरी पडल्या. नंदोरी परिसरात मंगळवारी रात्री १० वाजता अचानक पाऊस कोसळला. त्यानंतर बुधवारी पहाटे ६ वाजता पुन्हा पावसाने हजेरी लावली. दुपारी १ वाजेपर्यंत थांबून थांबून पाऊस सुरू होता. सध्या कापूस वेचणीच्या कामाला कापूस उत्पादकांकडून गती दिली जात आहे. अशातच अचानक आलेल्या पावसामुळे बोंडातून निघालेला कापूस भिजला. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. सेलू तालुक्यातील घोराड तसेच परिसरात बुधवारी पहाटे आणि दुपारी कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला. कारंजा तालुक्यातील ठाणेगाव, सेलगाव, मोर्शी, हेटीकुंडी तर आष्टी तालुक्यातील काही भागात पावसाच्या तुरळक सरी झाल्या. यामुळे वातावरणातील गारवा वाढला आहे. आर्वी तालुक्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाला. पिंपळखुटा भागातील तरोडा, गुमगाव येथे मंगळवारी रात्री तर बोरगाव (हा.) परिसरात बुधवारी दुपारी बºयापैकी पाऊस झाला. यामुळे शेतातील कापूस भिजला. मोझरी (शे.) परिसरात मंगळवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. यामुळे भाजीपाला वर्गीय पिकांसह कापूस, तूर पिकाला फटका बसला आहे. शिवाय थंडीत वाढ झाली आहे.
वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा उभ्या पिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 15:09 IST
वर्धा जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. यामुळे गारठ्यात वाढ झाली असून कापूस, तूर, गहू तसेच भाजापाला वर्गीय पिकांना याचा चांगलाच फटका बसला आहे.
वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा उभ्या पिकांना फटका
ठळक मुद्देगारठ्यात वाढ, भाजीपाला पिकाचेही नुकसान