पिंपळखुटा : सर्वत्र दडी मारलेल्या पावसाने पंधरवड्यापासून हजेरी लावली. त्यामुळे मान टाकलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली. त्यातच चार दिवसापासून पावसाच्या उघाडीमुळे परिसरातील शिवारांमध्ये सर्वच पिकांच्या परिस्थितीत चांगली सुधारणा झाली आहे. परंतु यातच रोगांची लागण आणि वन्यप्राण्यांचा हैदोस पसरल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. सततच्या पावसामुळे पिकांबरोबरच शेतात तणही वाढले आहे. सोयाबीन, ज्वारी व कपासीच्या पिकांवर रोगांचा व किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. वातावरणातील बदलामुळे फवारणी, निंदण व डवरणीच्या कामाला वेग आला आहे. सर्वांची एकाच वेळी कामाची धावपळ झाल्याने मजुरांची चणचण भासत आहे. परिणामी मजुरांचे दर वाढले आहे. त्यामुळे शेतकरी तणनाशकाच्या फवारणीला पसंती देत आहे. उशिरा व दुबार, तिबार पेरणी होवूनही सध्यातरी पिके समाधानकारक आहे. संततधार पावसाने खरीप हंगामातील सर्वच पिकांना जीवदान मिळाले. मात्र डवरलेली पिके पाहताच पिंपळखुटा व परिसरातील शिवारांमधील वन्य प्राण्यांनी हैदोस घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकरी पुरता चिंतातुर झाला आहे. रोही व डुकरांनी शेतात शिरून उभ्या पिकांचे नुकसान करण्याचा सपाटा सुरू केला आहे. शेतकरी रात्रभर शेतात पिकांचे रक्षण करावे लागत आहे. तसेच कपाशीवर मर रोगांचे आक्रमक सुरू झाले असून पिके वाळत आहे. त्यामुळे शासनाने यावर मार्ग काढावा, अशी मागणी शेतकरी करीत आहे.(वार्ताहर)
पावसाने पिके बहरली वन्यप्राण्यांचा हैदोस सुरू
By admin | Updated: September 18, 2014 00:02 IST