दिवाळीपूर्वी होणार वेतन : भीकमांगो आंदोलन स्थगितवर्धा : लॅन्को येथील कामगारांनी प्रलंबीत वेतनाच्या मागणीकडे लक्ष वेधण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या दालनात भीकमांगो आंदोलन केले. हे तीन दिवसीय आंदोलन शुक्रवारी स्थगित करण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून कामगार अधिकारी यांनी मध्यस्थाची भूमिका घेत कंपनी प्रशासनासोबत चर्चा केली. तसेच प्रलंबीत वेतन दिवाळीपूर्वी अदा करण्याच्या मागणीवर तोडगा काढला.यात कंपनी प्रशासनाने कामगारांचे वेतन तसेच स्थानिक कंत्राटदार यांचे थकीत देयक देण्याचा निर्णय घेतला. कामगारांचे एक वेतन दिवाळीपूर्वी होणार असून पुढील पंधरा दिवसापर्यंत एक वेतन देण्याचे मान्य केले आहे. तसेच स्थानिक कंत्राटदार यांचे ए.बी.सी. गटाप्रमाणे ५० टक्के अशा किस्तीत दिवाळीच्यापूर्वी आणि उर्वरीत ३० नोव्हेंबरच्या आत देण्याचे मान्य केले आहे. लेखी स्वरूपात कंपनी प्रशासन अधिकारी यांनी कळविले आहे. यावेळी कंपनी प्रशासनाचे अधिकारी ए.पी. कुंड, राजेश जुनुनकर, व्यवस्थापक अशोक शर्मा, वि.पी. अरूणकुमार मिश्रा, व्यवस्थापक प्रमोद गायकवाड, पाटील यांची चर्चेला उपस्थिती होती. कंपनी प्रशासनाने उर्वरित मागण्या सोडविण्यास नकार दिल्यास जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कामगार अधिकारी कार्यवाही करतील अशा सूचना देण्यात आल्या आहे. या सम्स्येवर तुर्तास तोडगा निघाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे कामगार संघटनेचे अध्यक्ष सुनील गफाट यांनी कळविले आहे.(स्थानिक प्रतिनिधी)
कामगारांच्या वेतनाचा प्रश्न अखेर निकाली
By admin | Updated: October 29, 2016 00:55 IST