पुलगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा व्हॉट्सअॅपवर अपमानजनक मजकूर टाकल्याच्या निषेधार्थ मंगळवारी पुलगाव शहर व ग्रामीण भागात कडेकोट बंद पाळण्यात आला. यावेळी सुरक्षेच्या दृष्टीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.येथील नाचणगाव, सोरटा, हिवरा, कवठा (रे.), गुंजखेडा येथील विविध आंबेडकरी संघटनेच्यावतीने पुलगाव शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारी १२ वाजताच्या सुमारास नागरिकांचा मोर्चा महाराष्ट्र शासनाचा निषेध असो, सवर्ण सेनेचा शर्मा यास घटक झालीच पाहिजे, अशी नारेबाजी करीत निघालेल्या मोर्चाचे शहरातील प्रमुख रस्त्यावरून फिरून नगरपरिषद येथे डॉ. आंबेडकरांच्या पुतळयाजवळ पोहचताच सभेत रूपांतर झाले. या मोर्चामुळे शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना सुट्टी घोषित केली होती. शहरातील सर्व खासगी वाहणे, आॅटो, जागीच उभे होते. सावधगिरी म्हणून काही बँकानी बंद ठेवला होता. मोर्चात शहरातील काँग्रेसचे थूल, पिंटू मेश्राम, अजय भगत, विपीन बोरकर, मनसेचे तालुका पदाधिकारी नितीन तुर्के व पदाधिकारी प्रशांत राऊत, विनय भटकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे पुरुषोत्तम थुल, भोलानाथ बन्सोड, एन.बी. झटाले व पदाधिकारी, नाचणगावच्या सरपंच सुनिता जुनघरे, सदस्य घोडेस्वार, डॉ. आंबेडकर पुतळा समितीचे सांगोले, कवठा संघटनेचे दिनेश कवाडे, सुमेध वासेकर, बडवाने व नागरिकांची उपस्थिती होती.(शहर प्रतिनिधी)
पुलगाव कडकडीत बंद
By admin | Updated: November 11, 2014 22:44 IST