वर्धा : पोलीस ठाण्यात करण्यात आलेल्या तक्रारीवर तपास न करण्याच्या कारणावरून दोन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पुलगाव ठाण्यांतर्गत येत असलेल्या सोरटा येथील बिट जमादार देविदास कामडीला लाचलुचपत प्रतिबधंक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. ही कारवाई रविवारी केली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलगाव पोलीस ठाण्यात घरगुती कारणावरून झालेल्या वादाची तक्रार दाखल करण्यात आली होती. या घरगुती भांडणात थोरल्याने त्याच्या पत्नीची बाजू घेतल्याने धाकट्याच्या पत्नीने तक्रार केली होती. सदर प्रकरण सोरटा बिटातील असल्याने तपासाकरिता सोरटा येथील बिट जमादार देविदास कामडी याच्याकडे पाठविण्यात आले. तपासादरम्यान १७ डिसेंबर रोजी जमादार कामडी याने तक्रारीत आरोपी म्हणून नोंद असलेल्या थोरल्या भावाला पोलीस ठाण्यात बोलविले. यात कामडीने तक्रारकर्त्यांला प्रकरणाचा तपास पुढे न करण्याकरिता दोन हजार रुपयांची मागणी केली. पोलिसांचा ससेमिरा टाळण्याकरिता तक्रारदाराने त्याला प्रारंभी एक हजार रुपये दिले व उर्वरित हजार रुपये १८ डिसेंबर रोजी देण्याचे ठरविले. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली. दरम्यान १८ तारखेला लाचेच्या मागणीची पडताळणी करण्याकरिता कामडीसोबत दुरध्वनीवर बोलणी करण्यात आली. झालेले संभाषण रेकॉर्ड करण्यात आले. ते लाचलुचपत प्रतिबधंक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऐकले असता कामडी याने लाच घेण्यास समर्थता दर्शविल्याचे सिद्ध झाले. यावरून कामडीला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेत पुलगाव ठाण्यात त्याच्यावर कलम ७, १५ लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये गुन्हा दाखल केला. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक अनिल लोखंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रदीप चौगावकर, सारीन दुर्गे सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप देशमुख, हवालदार संजय खल्लारकर, पाराशर, पांडे यांनी केली.(प्रतिनिधी)
पुलगाव ठाण्याचा लाचखोर पोलीस जमादार एसीबीच्या जाळ्यात
By admin | Updated: December 21, 2014 23:04 IST