आष्टी (शहीद) : चोरी मालाच्या तपासासाठी पोलीस उपनिरीक्षक व शिपाई रस्त्याने जाताना त्यांना शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी सुरज भार्गव, तन्नु भागर्व या दोघांवर भांदविच्या ३५३, २९४, ३३२, १८६, ३२३,५०४, ५०६ कलमान्वये कारवाई करण्यात आली. ही घटना बुधवारी रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास घडली.पोलीस सुत्रानुसार, उपनिरीक्षक विष्णु कराळे व शिपाई विजय भोयर हे सरस्वती बुक डेपो परिसरात चोरीच्या तपासासाठी जात होते. दरम्यान रस्त्याच्या मधोमध दुचाकी उभी करून पाच-सहा मित्रांसोबत सुरज भार्गव गोष्टी करीत होता. त्यांना शिपाई भोयर यांनी हटकले; मात्र सुरज याने शिपाई भोयर यांना मारहाण करणे सुरू केली. लागलीच त्याचा भाऊ तन्नु भार्गव यानेही माहाण करणे सुरू केले. प्रकरण सोडविण्यासाठी उपनिरीक्षक कराळे गेले असता त्यांनाही मारहाण केली.यावेळी त्यांनी आरोपींना आम्ही पोलीस असल्याचे सांगितले असता ‘आम्ही पोलिसांना कुत्रे समजतो’, असे म्हणून मारहाण सुरूच ठेवली. यावरून मोठा जमाव जमला होता. काही वेळ तणावाचे वातावरण होते. याप्रकरणी सुरज (२५) व तन्नु भार्गव (३३) या दोघांवर भादंवि ३५३ (सरकारी कामात अडथळा), २९४ अश्लील शिवीगाळ, ३३२ शासकीय सेवकास मारहाण, ३२३ लाथाबुक्क्यांनी मारहाण, ५०४ शिवीगाळ, ५०६ धमकी, १८४ जखमी करणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला. दोन्ही आरोपी अद्याप फरार असून प्रकरणाचा तपास ठाणेदार रमाकांत दुर्गे करीत आहेत.(प्रतिनिधी)
पीएसआय व शिपायाला शिवीगाळ करून मारहाण
By admin | Updated: March 27, 2015 01:21 IST