मागणी : अखिल भारतीय किसान क्रांती संघटनेचे शासनाला साकडेहिंगणघाट : मानवता हाच धर्म असा मूलमंत्र देणारे मानवतेचे पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगेबाबा यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत केंद्र सरकारला अखिल भारतीय किसान क्रांती संघटनेच्यावतीने या मागणीचे पत्र पाठविण्यात आले आहे.यापूर्वी ही मागणी करण्यात आली. मात्र केंद्र व राज्य सरकारचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. दीड दशकापूर्वी शासनाने नागपूर व अमरावती विद्यापीठाला या महान संताचे नाव देण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे संतांचे कार्य अधिक प्रभावी स्वरुपात पोहचविता आले. राज्य सरकारने ग्रामस्वच्छता अभियान व निर्मल ग्राम योजना राबवित आहे. याची मांडणी वंदनीय संत तुकडोजी महारज व संत गाडगेबाबा यांना केली होती. त्याची आता अंमलबजावणी होत आहे. राज्यशासनाने या संताचे कार्य पाहता केंद्र सरकारकडे याबाबत विनाविलंब भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाकरिता प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. देशात स्वच्छ भारत अभियानासाठी कार्य सुरू आहे. वंदनीय तुकडोजी महाराज व ग्राम स्वच्छतेचे शिल्पकार कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या आदर्श व प्रेरणादायी विचारांचे द्योतक असल्याने केंद्र सरकारने याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी, या मागणीचे पत्र राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना पाठविण्यात आले असून याची प्रत जिल्हाधिकारी यांना देण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)
संत तुकडोजी व गाडगेबाबांना भारतरत्न प्रदान करा
By admin | Updated: April 25, 2015 00:00 IST