वडनेर : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न तसेच त्यांच्या हक्काबाबत प्रलंबित असलेल्या मागण्या तत्काळ सोडवाव्यात अशा सूचना राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्य डॉ. लता ओमप्रकाश महतो यांनी दिल्यात.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नगरपरिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे तसेच सर्व नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. सफाई कामगारांना नियमितपणे वेतन देण्यासोबतच त्यांच्या सेवाविषयक प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची सूचना करताना डॉ. लता महतो म्हणाल्या की, सफाई कामगारांना चांगली वागणूक देतानाच त्यांना या व्यवसायातून बाहेर काढण्यासोबतच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकताही त्यांनी यावेळी व्यक्त केली. नगरपरिषदांमध्ये एक हजार लोकसंख्येमागे एक सफाई कामगार असणे आवश्यक आहे. त्यानुसार सफाई कामगाराची भरती करावी, तसेच त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देतानाच त्यांच्यासाठी गृहनिर्माण योजनाही राबवावी. वर्धा शहरात जीर्ण झालेल्या निवासस्थानाऐवजी नवीन घरकुल योजना सुरू करावी तसेच वर्षातून दोनवेळा गणवेश द्यावेत. नियमित आरोग्य तपासणी करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. वर्धानगर परिषदेमध्ये २४८ सफाई कामगार कार्यरत असून, त्यांना सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन व भत्ते देण्यात यावे. तसेच लाड कमीटीच्या सुचनेनुसार सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. हिंगणघाट नगरपरिषदेत १७४ सफाई कामगार आहेत. तसेच आर्वी ८७, पुलगाव ८१, देवळी ११ तर सिंदी(रेल्वे) नगर परिषदेत १३ सफाई कामगार कार्यरत आहेत. त्यांना सर्व सुविधा मिळाव्या.(शहर प्रतिनिधी)
सफाई कर्मचाऱ्यांना आवश्यक सर्व सुविधा द्या
By admin | Updated: June 22, 2014 00:07 IST